महापालिकेत भाजपला धक्का देत ऐतिहासिक सत्तांतर घडवल्यानंतर शिवसेनेचा महापौर निवडून आला. मात्र, त्यानतंर शिवसेनेतील गटबाजीला सुरुवात झाली आहे. सत्तांतरानंतर पहिल्यांदाच जळगाव शहरातील पदाधिकारी व नगरसेवकांची बैठक घेण्यासाठी आलेल्या सेनेचे खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पक्षातील मतभेत चव्हाट्यावर आले.
या बैठकीत भाजपचे अजून काही नगरसेवक पक्षात दाखल होतील अशी चर्चा असताना जे नगरसेवक भाजपमधून फुटून शिवसेनेत आले होते, त्यातील उपमहापौर कुलभूषण पाटील वगळता बहुसंख्य नगरसेवक या बैठकीला अनुपस्थितीत होते.
भाजपमधून सेनेत दाखल झालेल्या ३० नगरसेवकांपैकी केवळ उपमहापौर कुलभुषण पाटील, प्रा.सचिन पाटील, ज्योती चव्हाण यांनीच या बैठकीत हजेरी लावली.
कोणत्या नगरसेवकांची बैठकीला दांडी?
भाजपची सत्ता जाण्यात महत्वाची भूमिका पार पाडलेल्या नवग्रह मंडळातील नगरसेवकांनी देखील या बैठकीकडे पाठ फिरवली होती. नवग्रह मंडळातील केवळ उपमहापौर कुलभूषण पाटील एकटेच उपस्थित होते. नवनाथ दारकुंडे, चेतन सनकत, किशोर बाविस्कर, भरत कोळी या नगरसेवकांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरवली.
शिवसेनेच्या बैठकीत महानगरातील ज्येष्ठ व निष्ठावंत समजले जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांनीही हजेरी न लावल्याने नाराजीचा सूर सेनेत उमटू लागला आहे. माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे, राहुल नेतलेकर, सुनील ठाकूर, जितेंद्र गवळी, सोहम विसपुते यांच्यासह राष्ट्रवादीतून सेनेत आलेले निलेश पाटील हे देखील या बैठकीत गैरहजर राहिले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times