मधुसूदन नानिवडेकर, सिंधुदुर्ग/सुनील नलावडे, रत्नागिरी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर होते. आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रेसाठी येणारे मुख्यमंत्री ठाकरे नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत काही भाष्य करतील अशी अपेक्षा होती. मात्र देवीचे दर्शन घेऊन मुख्यमंत्री काहीही न बोलता पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले. गणपतीपुळे येथील जाहीर सभेत देखील मुख्यमंत्र्यांनी नाणार प्रकल्पाबाबत बोलणे टाळले.

मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील भराडी देवीची यात्रा सोमवारी मोठ्या दिमाखात सुरू झाली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक या यात्रेला आले आहेत. प्रथमच मुख्यमंत्रिपद भूषविणारे उद्धव ठाकरे या यात्रेला आवर्जून उपस्थित राहिले. त्यामुळे ते बहुचर्चित नाणार प्रकल्प आणि वर्तमानपत्रातील जाहिरात यावर भाष्य करतील, अशी अपेक्षा होती. यावेळी आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाने मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला. मुख्यमंत्र्यांसोबत उद्योगमंत्री सुभाष देसाई, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत, मंत्री अनिल परब, खासदार विनायक राऊत, माजी मंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, संदेश पारकर आदी उपस्थित होते. मात्र देवीचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे हे काहीही न बोलता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आढावा बैठकीसाठी निघून गेले. त्यामुळे उलटसुलट चर्चांना वेग आला होता.

यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री कोकणात कोणत्या कामासाठी आले माहीत नाही. मात्र एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर मुख्यमंत्री तिथे काही तरी देऊन जातात. इथे मात्र मुख्यमंत्र्यांनी न बोलता जाणेच पसंत केले. मुख्यमंत्र्यांची परंपरा त्यांनी मोडली. फक्त दोन मंत्र्यांची मिनी कॅबिनेट घेऊन हे मुख्यमंत्री काय विकास करणार आणि किती निधी देणार जिल्ह्याला?’

‘निधीची कमतरता पडणार नाही’

सिंधुदुर्गात जाण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी जिल्ह्याला भेट दिली. दुपारी त्यांनी श्री क्षेत्र गणपतीपुळे येथील स्वयंभू गणेशाचे आपल्या सहकारी मंत्र्यांसह दर्शन घेतले. त्यानंतर ठाकरे यांच्या हस्ते मंदिर परिसर विकासाचे भूमिपुजन व रस्ते कामाच्या कोनशीलेचे अनावरण करण्यात आले. तत्पूर्वी मंदिर संस्थांतर्फे मुख्यमंत्र्यांचा सत्कारही करण्यात आला. त्यानंतर जाहीर सभेत बोलताना, आपले सरकार कृतीला महत्त्व देणारे असल्याचे सांगून पुढील कामे करायची आहेत त्याचे आराखडे तयार करून सादर करा. त्यासाठी निधीची कमतरता पडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोकणवासीयांना दिली. या सभेला नाणार प्रकल्पसमर्थक आणि प्रकल्पविरोधक अशी दोन्ही मंडळी उपस्थित होती. मुख्यमंत्री नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका जाहीर करतील अशी अपेक्षा होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी काहीच भाष्य न केल्याने ग्रामस्थ नाराज झाले.

भास्कर जाधव यांची नाराजी

गणपतीपुळे विकास आराखडा भूमिपुजन प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार भास्कर जाधव यांची नाराजी स्पष्टपणे दिसून आली. व्यासपीठावर मुख्यमंत्री आल्यानंतर आमदार जाधव व्यासपीठावर आले व मागील रांगेत बसले. मंत्री उदय सामंत यांनी विनंती केल्यावर त्यांनी पहिल्या रांगेतील शेवटच्या खुर्चीत बसणे पसंत केले. मुख्यमंत्र्यांच्या सत्काराच्या वेळी खा. विनायक राऊत यांनी भास्कर जाधव यांना जवळ आणण्याचा प्रयत्न केला, मात्र जाधव यांनी खा. राऊत यांचा हात झटकला. व्यासपीठावरील ही नाराजी उपस्थितांच्या नजरेत आली. कार्यक्रमानंतर भास्कर जाधव यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासही टाळाटाळ केली.

‘मुख्यमंत्र्यांनी निराशा केली’

मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर टीका करताना नारायण राणे म्हणाले, ‘देवीसाठी वेळ देऊ न शकणारे मुख्यमंत्री लोकांना काय वेळ देणार? मी मंत्री असताना तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्ह्याला भरघोस निधी दिला होता. आज राज्य अधोगतीकडे चालले आहे. निवडणुकीत दिलेले शब्द पाळले गेले नाहीत. सरकार आले तेव्हा एकदा निराशा झाली आणि आजच्या या दौऱ्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याची निराशा केली.’

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here