: करोना निर्बंधांवरून पुन्हा एकदा ठाकरे सरकारसमोर पेच निर्माण झाला आहे. कारण करोना संसर्ग कमी झाला असला तरी सावधगिरी बाळगत सरकारने यंदाच्या वारीलाही विविध निर्बंधांसह परवानगी दिली आहे. करोना निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी फक्त १० मानाच्या पालख्यांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र असं असलं तरी वारकऱ्यांच्या काही संघटना मात्र सरकारच्या या निर्णयाविरोधात भूमिका घेत असून त्यांनी आक्रमक इशारा दिला आहे.

“सध्या करोना प्रादुर्भाव कमी असल्याने महाविकास आघाडी सरकारने नेहमी प्रमाणे वारकऱ्यांना पालखीत सहभागी होण्याची परवानगी द्यावी, अन्यथा ‘आमची वारी, आमची जबाबदारी’ अशी घोषणा देत विठुरायाचे दर्शन घेऊ,” अशा इशारा विश्व सेनेनं दिला आहे.

बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?
वारकरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री यशोमती ठाकुर, आमदार सुलभा खोडके, आमदार बळवंत वानखडे, जि.प. अध्यक्ष बबलु देशमुख, विभागीय आयुक्त पियूषसिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, हभप अरुण महाराज बुरघाटे, हभप श्याम महाराज निचित, हभप मधुकर महाराज साबळे, हभप बाळकृष्ण आमले उपस्थित होते.

विदर्भातील ४० प्रमुख पालख्या आहेत. त्यांच्या प्रत्येकी किमान १० वारकऱ्यांना करोना नियमांचे पालन करुन स्वतंत्र वाहनाद्वारे जाण्याची परवानगी देण्याची मागणी वारकरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. करोना साथीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता हे सर्वोच्च प्राधान्य मानून पालखी सोहळ्यावर मर्यादा घालण्यात आली आहे. तथापि, सेनेच्या या मागणीबाबत पाठपुरावा करण्यात येईल असं पालकमंत्र्यांनी सांगिले.

आषाढी वारीसाठी विभागातील सर्व जिल्ह्यामध्ये पालख्यांबाबत नियोजनासाठी दरवर्षी पालखी सोहळ्याच्या आधी विभागीय स्तरावर बैठक घेण्यात येणार असल्याचे आश्वासन जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. यावर विश्व वारकरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निराशा व्यक्त करत यंदा तरी पालख्यांना परवानगी द्या, अन्यथा माझी वारी माझी जबाबदारी घेऊन विठुरायांचे दर्शन घेणार असल्याचं सांगितलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here