वृत्तसंस्था, नवी दिल्ली

इंटरनेट सेवेच्या वायफाय प्रवासातील गुगलचे ‘स्टेशन’ आता बंद होणार आहे. सन २०१५मध्ये गुगलने भारतीय रेल्वे आणि रेलटेल यांच्यासमवेत मोफत सार्वजनिक वायफाय सेवा देणारी ‘स्टेशन’ ही सेवा सुरू केली होती. देशात आपली ऑनलाइन ओळख निर्माण करणे सोपे झाले असून इंटरनेटही स्वस्त झाले आहे. त्यामुळे आता ‘स्टेशन’ सेवेची आवश्यकता उरली नसल्याचे कारण गुगलने दिले आहे.

‘स्टेशन’ सेवेने देशातील ४०० स्थानके २०२०च्या मध्यापर्यंत जोडण्याचे ध्येय गुगलने बाळगले होते. परंतु, हा आकडा २०१८मध्येच पार केल्याचे गुगलचे विभागीय उपाध्यक्ष सीझर सेनगुप्ता यांनी म्हटले आहे. सध्या देशातील अनेक स्थानकांतून ही सेवा सुरू आहे. अन्य ठिकाणीही ही सेवा दूरसंचार कंपन्या, आयएसपी आणि स्थानिक प्रशासकीय संस्था यांच्या सहकार्याने सुरू आहे. भारताखेरीज ही सेवा नायजेरिया, थायलंड, फिलिपाइन्स, मेक्सिको, इंडोनेशिया, ब्राझील व दक्षिण आफ्रिका येथेही पुरवली जात असून ही संकल्पना जगभरात लोकप्रिय ठरली आहे.

भारतात डेटा स्वस्त
‘स्टेशन’ सेवा बंद करण्याचा निर्णय गुगलने घेतला असला तरी भारतीय रेल्वे व रेलटेल यांच्या भागीदारीतून बाहेर पडण्यासाठी गुगलने आता हालचाली सुरू केल्या आहेत. ही सेवा सुरू ठेवण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. वाढत्या तांत्रिक गरजा, पायाभूत सुविधा पुरवणे आमच्या भागीदारांना शक्य होत नसल्याचे गुगलचे म्हणणे आहे. सेनगुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, भारतामध्ये प्रतिजीबी मोबाइल डेटा हा अन्य देशांपेक्षा स्वस्तात मिळू लागला आहे. भारतीय नागरिक यामुळे दरमहिना सरासरी १० जीबी डेटा वापरू लागला आहे. गुगलला आता या सेवेत स्वारस्य उरले नसून आणखी मोठ्या संधींना गवसणी घालण्याचे लक्ष्य खुणावत आहे, असे सेनगुप्ता म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here