‘अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रीपदावर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दावा सांगितला जाईल व तेथे आघाडीत वादाची ठिणगी पडेल. त्या वादातून राज्यात नव्या राजकीय घडामोडींना वेग येईल, असे जे पसरवले जात आहे त्यात काहीच तथ्य नाही. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद हा ‘पाच’ वर्षांसाठी दिलेला शब्द आहे’, असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेकडेच राहिल हे स्पष्ट केलं आहे.
‘सत्ता टिकवणं तिनही पक्षांची गरज’
‘महाराष्ट्रातील सरकार चालविणे व टिकवणे ही आघाडीतील तिन्ही पक्षांची गरज आहे. मजबुरी हा शब्द मी मुद्दाम वापरत नाही. केंद्रासह अनेक राज्यांत भाजपचे शासन आहे, पण महाराष्ट्रासारखे राज्य हाती नसेल तर इतर मोठी राज्ये हाती असूनही जीव रमत नाही. काँग्रेसकडे एखाद्-दुसरे राज्य आहे, पण महाराष्ट्राच्या सत्तेतील सहभाग सगळय़ात महत्त्वाचा. राष्ट्रवादी काँग्रेसदेखील महाराष्ट्राबाहेर विस्तारली नाही व हिंदुत्ववादाचा सगळय़ात मोठा ‘ब्रॅण्ड’ ठरूनही शिवसेनेला महाराष्ट्राबाहेर मोठी झेप घेता आली नाही. अशा वेळी महाराष्ट्राची सत्ता टिकवणे हे तीनही पक्षांना आवश्यक’ असल्याचं राऊत म्हणाले.
इतकंच नाहीतर यावेळी त्यांनी भाजपवरही निशाणा साधला. ‘सगळे बरे चालले असताना बसलेली घडी विस्कटण्याचा विचार कोण करेल? दिल्लीच्या धावत्या भेटीचे कवित्व हे फक्त बुडबुडेच आहेत. मोदी-ठाकरे भेटीचे फलित हे वर्तमानापेक्षा भविष्याचा वेध घेणारेच ठरो.’ अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times