म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

म्हाडाचे देतो सांगून काही भामट्यांनी प्रभादेवीत राहणाऱ्या बँक मॅनेजरला साडे आठ लाख रुपयांस फसविले आहे. म्हाडाचे घर मिळणार म्हणून चार वर्षांपासून वाट पाहणाऱ्या मिलिंद कदम (नाव बदललेले) यांची म्हाडाच्या घराचे आश्वासन देत झाली आहे. म्हाडाच्या घरांच्या सोडतीतील घर परस्पर कदम यांच्या नावावर केले जाईल, असे त्यांना सांगण्यात आले. त्या मोहात पडून कदम यांनी दोघा भामट्यांना १० लाख रुपये दिले. फसवणूक झाल्याचे असल्याचे समजताच कदम यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली असून दादर पोलिसांकडून तपास सुरू झाला आहे.

प्रभादेवी येथे राहणारे कदम बहुराष्ट्रीय बँकेत मॅनेजर असून त्यांची पत्नी उच्च न्यायालयात लिपिक म्हणून सेवेत आहेत. २०१६मध्ये त्यांच्या राहत्या ठिकाणी इमारत बांधण्याचे काम सुरू असल्याने त्यांना नवीन घराची आवश्यकता होती. त्या शोधात असताना एका व्यक्तीने प्रभादेवीमधील नवदुर्गा सोसायटीमध्ये म्हाडाकडून काही रिक्त घरांची विक्री केली जाणार असल्याचे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून कदम यांनी त्यांनी सुचविलेल्या दलालाशी संपर्क साधला. त्याने म्हाडात दलाल म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधून त्या सोसायटीतील उर्वरित घरांची सोडत काढून त्यात कदम यांचा क्रमांक येण्याची तजवीज करू, असे सांगितले. हा व्यवहार पूर्ण करण्यासाठी १० लाख रु. लागतील अशी अटही ठेवली.

तेव्हा कदम यांनी ऑगस्ट २०१६ मध्ये सुरुवातीला सात लाख रु., नंतर एनईएफटी/आरटीजीएसमधून दोन लाख रु. बँकेत जमा केले. कदम यांच्याकडे पुढील एक लाख रु. रक्कम भरण्याचा आग्रह धरताना म्हाडाचे एक पत्र त्यांना दाखविण्यात आले. पत्रात घरासाठी अर्ज केला असून सोडत लागल्याचे नमूद केले होते. तेव्हा कदम यांनी एक लाख रु. भरले. त्यासाठी प्रॉमिसिंग नोटदेखील करण्यात आल्याचे कदम यांनी पोलिसांना सांगितले. यानंतर घराचा ताबा मिळण्यासाठी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळू लागल्यावर कदम यांचा संशय वाढला. त्यावर सातत्याने पाठपुरावा केला असता त्यातील एका दलालाने कदम यांना दीड लाख रुपये चेकने परत केले. पुढील रक्कम काही रक्कम मिळणार नसल्याचे लक्षात येताच कदम यांनी दादर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीआधारे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here