गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथून वाहणाऱ्या वैनगंगा नदीत तेंदूपत्ता बोद घेऊन चंद्रपूरकडे जाणारा ट्रक क्रमांक एम एच 34 बी जी-6111 मध्यरात्री 2:30 दरम्यान पूल ओलांडताना चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक नदीत कोसळला. ट्रकमध्ये वाहन चालक, वाहक आणि क्लीनर असे तिघेजण होते. त्यापैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण किरकोळ जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतकांमध्ये कालु उर्फ कमलेश सतविंदर सलूजा (25), नितीन दीपक बिके (32) आणि अजय अनिल कारपेनवार असे जखमी इसमाचे नाव असून आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे. मागील 20 ते 25 दिवसापासून गडचिरोली जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू होते. सध्या काम पूर्ण झाले असून संबंधित कंत्राटदार तेंदूपत्ताचे वाहतूक करून आपल्या सोयीनुसार चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या मुख्य गोदामात आपला तेंदूपत्ता घेऊन चालले आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील तेंदूपत्ता कंत्राटदारांचे मुख्य गोडाऊन हे प्रामुख्याने राजुरा, बल्लारपूर आणि चंद्रपूर येथेच आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलन झाल्यावर सर्वच कंत्राटदार हे चंद्रपूर जिल्ह्यातील गोडाऊनमध्ये तेंदूपत्ताचे बोद जमा करतात. त्या अनुषंगाने सदर ट्रकसुद्धा चंद्रपूर जिल्ह्यात तेंदूपत्ता घेऊन चालला होता.

काल सायंकाळी सिरोंचा तालुक्यातून निघालेला ट्रक आष्टी मार्गे चंद्रपूरकडे जाताना मध्यरात्री जवळपास 2.30 वाजताच्या दरम्यान आष्टी येथील वैनगंगा नदीत कोसळला. यात दोघेजण जागीच ठार झाले असून एकजण किरकोळ जखमी असल्याची माहिती आष्टीचे पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांनी मटाशी बोलताना दिली.

किरकोळ जखमी असलेला व्यक्ती कसेबसे बाहेर पडून पहाटेपर्यंत पुलावर प्रतीक्षा करत होता. पहाटेच्या दरम्यान आष्टीचे पोलीस निरीक्षक कुमार सिंग राठोड यांना माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता संबंधित व्यक्ती किरकोळ जखमी अवस्थेत आढळला. त्याला आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कुमार सिंग राठोड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक वैशाली कांबळे आणि चमू करीत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here