म. टा. विशेष प्रतिनिधी,

मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चांगलाच फरक जाणवला. अजूनही पहाटेचे तापमान दिलासादायक असल्याने ही जाणीव दिवसभर कायम राहील, अशी अपेक्षा मुंबईकरांना होती. मात्र ही अपेक्षा खोटी ठरवत कमाल तापमानाचा चांगलाच ताप जाणवला. मुंबईत सांताक्रूझ येथे सोमवारी कमाल तापमान ३८.१, तर कुलाबा येथे ३४.७ अंश सेल्सिअस होते. हे तापमान सांताक्रूझ येथील गेल्या तीन वर्षांतील फेब्रुवारीतील सर्वाधिक कमाल तापमान ठरले.

सांताक्रूझ येथे सोमवारी किमान तापमान १९.८ अंश, तर कुलाबा येथे २१.६ अंश सेल्सिअस होते. त्यानंतर दुपारी उन्हाचा ताप चांगलाच जाणवू लागला. रविवारीही सांताक्रूझ येथे किमान तापमान १९.२, तर कुलाबा येथे २१ अंश से. होते. कमाल तापमान ३२ अंशांपर्यंत पोहोचले होते. मात्र रविवारच्या तुलनेत सोमवारी, २४ तासांमध्ये कमाल तापमानाने चांगलीच उसळी घेतली. पारा सांताक्रूझ येथे ५.५ अंशांनी चढला होता. किमान आणि कमाल तापमानात तब्बल १८.३ अंशांचा फरक सांताक्रूझ येथे नोंदवला गेला. कुलाबा येथे हा फरक १३.१ अंश होता. सांताक्रूझ येथे आर्द्रतेचे प्रमाण ४६ टक्के, तर कुलाबा येथे ७७ टक्के नोंदवले गेले. त्यामुळे उपनगरांमध्ये उन्हाचा चटका जाणवला, तर शहरामध्ये उन्हाबरोबरच घामामुळे अधिक त्रास जाणवला. पुढील दोन ते तीन दिवस तापमान ३५ अंश किंवा त्यापुढे राहण्याची शक्यता आहे.

विक्रमी तापमान

या काळात तापमानात चढउतार होतच असते. मात्र या असह्य उकाड्यामुळे यंदाचा आणखी तापदायक ठरणार, अशी चिंता मुंबईकरांमध्ये निर्माण झाली. मात्र फेब्रुवारीमध्ये उन्हाळ्याच्या दिशेने वाटचाल होताना तापमानामध्ये असे तीव्र बदल जाणवतात, असे हवामान विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. सोमवारचे तापमान गेल्या दहा वर्षांमधील फेब्रुवारीतील चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक कमाल तापमान आहे. तर तीन वर्षांतील सर्वाधिक तापमानाचा उच्चांक सोमवारी नोंदवला गेला. या आधी सन २०१७ मध्ये फेब्रुवारीत ३८.८ सर्वाधिक कमाल तापमान नोंदवले गेले होते. सन २०१५मध्येही कमाल तापमान ३८.८ पर्यंत पोहोचले होते. सन २०१२ मध्ये हे तापमान ३९.१ अंश से. होते. आत्तापर्यंतचे फेब्रुवारीतील सर्वाधिक कमाल तापमान ३९.६ अंश सेल्सिअस आहे. सन १९६६ मध्ये हा तापमानाचा विक्रम नोंदवला गेला होता.

उन्हाळ्याच्या दिशेने प्रवास

मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमान अजूनही कमी आहे. मात्र कमाल तापमानाचा पारा हळुहळू चढत आहे. त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागली आहे, असे म्हणता येईल अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. येत्या तीन दिवसांमध्ये कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा येथे तापमानात हळुहळू दोन ते तीन अंशांची वाढ अपेक्षित असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here