: अहमदनगर शहरातील डीएसपी चौक ते बुऱ्हाणनगर रोड चौक या भिंगार कँटोन्मेंट हद्दीतून जाणाऱ्या रस्त्याला ‘पॉटींजर रोड’ असं नाव असताना गुगल मॅपवर ते रोड असं दिसत होतं. यासंबंधी ‘महाराष्ट्र टाइम्स’मधून बातमी प्रकाशित करण्यात आली. त्या आधारे अनेकांनी गुगलकडे पाठपुरावा केला. पुण्यात राहणाऱ्या एका अनिवासी भारतीय तरुणानेही मोठा पाठपुरावा केला. त्यानंतर गुगलने आपली चूक दुरूस्त केली असून मॅपवर या रस्त्याचे मूळ नाव दिसू लागले आहे.

डीएसपी चौक, नवीन जिल्हा न्यायालयाची इमारत, गोविंदपुरा चौक ते बुऱ्हाणनगर रोडचा चौक येथून हा रस्ता भिंगारजवळ नगर-पाथर्डी रोडला मिळतो. या रस्त्यावर लष्करी अधिकाऱ्यांचे जुने बंगले आहेत. त्या रस्त्याला पॉटींजर रोड असं नाव आहे. कोणत्याही यंत्रणेने, संघटनेने या रस्त्याला औरंगजेबाचे नाव कधीच दिलेले नाही. तरीही गुगल मॅपवर या रस्त्याला ‘औरंगजेब रोड’ असं नाव दर्शविण्यात येत होते. त्यासंबंधी बातमी प्रकाशित करण्यात आली होती. याची दखल अहमदनगरमधील काही संघटनांनी घेतली. त्यांनी निवेदने देऊन नाव बदलण्याची मागणी केली, आंदोलनाचे इशारे देण्यात आले.

गुगलने कशी सुधारली चूक?
पुण्यातील राज पी. या अनिवासी भारतीयाने ही बातमी वाचून गुगलकडे मोठा पाठपुरावा केला. राज मूळचे विदर्भातील आहेत. एका बहुराष्ट्रीय कंपनीत ते मोठ्या पदावर कार्यरत आहेत. कोविडमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ते भारतात परत आले असून पुण्यात राहतात. ‘महाराष्ट्र टाइम्स’ची बातमी त्यांनीही वाचली आणि यासाठी पाठपुरावा सुरू केला.

त्यांनी सांगितले की, ‘मराठा इतिहास आणि मराठी दोन्ही लहानपणापासून आवडते विषय आहेत. सोशल मीडिया आणि त्यावर येणाऱ्या पोस्ट, विशेषत: फेक न्यूजची सत्यता तपासून विश्लेषण करण्याची आवड आहे. ‘म.टा.’ मधील या रस्त्याच्या नावासंबंधीची बातमी वाचल्यानंतर लगेच ती गोष्ट गुगलच्या लक्षात आणून दिली. दुरूस्तीसाठी क्लेम केला. पण सुरवातीला गुगलने तो नाकारला. त्यामुळे आणखी पुरावे संकलित करण्याच्या कामाला लागलो. औरंगजेब रोड या नावाची एकही नोंद मिळाली नाही. पॉटींजर रोड नावाच्या नोंदी मात्र मिळाल्या. एका ब्रिटिश कुटुंबाने १९४८ मध्ये अहमदनगरमधील या रोडवरील बंगल्यात राहत असल्याची नोंद केल्याचे आढळून आले. त्यांचे वारस कॅनडात राहतात. त्यांची पोस्ट मिळाली. त्यांनी उल्लेख केलेल्या बंगल्याचे अक्षांश-रेखांश मिळविले. हा सर्व डाटा गुगलला पाठविला. हा रस्ता लष्करी भागातून जातो. लष्कराने कामासाठी काढलेल्या निविदांमध्येही पॉटींजर रोड असा उल्लेख आढळून आला. ही सर्व माहिती आपण गुगलला कळवली. अखेर गुगलने ती मान्य करून त्या रस्त्याचे औरंगजेब नाव बदलून पुन्हा पॉटींजर रोड असे नाव दिले आहे. तंत्रज्ञानाला उत्तर आपण तंत्रज्ञानानेच देऊ शकतो, हे यावरून स्पष्ट झाले.’ असंही राज पी. यांनी सांगितलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here