मुंबई टाइम्स टीम

बॉलिवूडविश्वात अत्यंत मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार पटकावल्यानं अभिनेत्री अत्यंत आनंदात आहे. या निमित्तानं ‘मुंबई टाइम्स’शी गप्पा मारताना, ‘मराठी-हिंदी सिनेसृष्टीमध्ये आज प्रतिभावंत अभिनेत्रींची फळी आहे. पण, त्यांच्यामधल्या गुणवत्तेला पूर्ण न्याय मिळत नाही. वयाच्या एका विशिष्ट टप्प्यानंतर अभिनेत्रींसाठीही विशेष भूमिका लिहिल्या गेल्या पाहिजेत’, अशी अपेक्षा तिनं व्यक्त केली. अमृता लवकरच एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. ही भूमिका एका डान्सरची असल्याचं समजतंय.

‘गली बॉय’ या चित्रपटातील अभिनयासाठी अमृतानं यंदा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री हा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. ती म्हणाली, की ‘बॉलिवूडमध्ये हिरो म्हणून काम करत असताना अभिनेत्यानं विशिष्ट वय ओलांडल्यावर ज्याप्रमाणे त्याच्यासासाठी ठरवून सिनेमे, भूमिका लिहिल्या जातात, तसं अभिनेत्रींच्या बाबतीत का होऊ नये? त्यांच्यासाठीदेखील वयाच्या त्या टप्प्यावर ठरवून सिनेमे लिहिले जावेत. नायिका म्हणून नव्हे, तर एक ‘अभिनेत्री’ म्हणून तिच्यासाठीही वेगळ्या भूमिका लिहिल्या जाव्यात, ज्या सिनेमाचा केंद्रबिंदू ठरू शकतील. वयाच्या चाळीशी, पन्नाशीत अभिनेत्रींनी केवळ एकाच प्रकारच्याच भूमिका कराव्यात हे समीकरण योग्य नाही. लेखक-दिग्दर्शकांनी तिच्यासाठीही वेगळ्या धाटणीच्या भूमिका निर्माण करायला हव्यात.’

भूमिकांमधील विविधतेबाबत ती पुढे म्हणाली, की ‘भाषा कोणतीही असो, केवळ ती भूमिका वेगळ्या पद्धतीनं लिहिलेली असावी. कारण, मला एकसारखी भूमिका करायची नाही. मग तो मराठी, हिंदी किंवा इतर कोणत्याही भाषेतला सिनेमा असो. अभिनेत्रींमधल्या गुणवत्तेला पूर्ण न्याय मिळत नाही.’ फिल्मफेअर पुरस्कारानं अभिनेत्री म्हणून आपली जबाबदारी अधिक वाढल्याचंही ती सांगते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here