नगर- मनमाड महामार्गावर विळद घाटात रविवारी हा अपघात झाला. कारमधील रवींद्र किसन पाटील (वय ४५) व मनीषा रवींद्र पाटील (वय ४२ दोघही रा. पाचोरा जि. जळगाव) ठार झाले. त्यांचा मुलगा ऋषिकेश (वय ९) जखमी झाला आहे. कारमध्ये हे तिघेच होते.
याबाबत समजलेली माहिती अशी की, जळगाव येथून पाटील कुटुंब पुण्याकडे जात होते. विळद घाटात समोरून एक कंटेनर येत होता. कंटेनर चालकाचा ताबा सुटल्यामुळे तो पाटील यांच्या गाडीवर जाऊन आदळला. या अपघातामध्ये पाटील दाम्पत्य जागीच ठार झाले. घटनेची माहिती विळद येथील ग्रामस्थांकडून पोलिसांना मिळाल्यानंतर तात्काळ एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
एमआयडीसीच्या पोलीस कॉन्स्टेबल कल्पना अवसरे यांनी व त्यांच्या पथकाने या मुलाला सुखरूप बाहेर काढले. ग्रामस्थांनीही मदत केली. मुलाच्या डोक्याला जखम झाली असून त्याला येथील डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पाटील दाम्पत्याचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी त्यांच्या जळगावच्या घरी संपर्क करून अपघाताची माहिती कळविली आहे. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला फेकली गेली होती. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने ती ओढून काढली. अपघातानंतर कंटेनर चालक पळून गेला. त्याच्या सहायकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अपघात झाल्यानंतर कंटेनर चालक हा फरार झालेला आहे तर त्याचा साथीदार हा या अपघातामध्ये जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times