: वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील केंजळगड पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांपैकी १० वर्षीय मुलगा खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. मयंक गणेश उरणे (रा. सासवड, ता. पुरंदर) असं पाय घसरून खोल दरीत पडलेल्या मुलाचं नाव असून तो गंभीर जखमी झाला आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला दरीतून बाहेर काढण्यात आलं. वाई येथे प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठवण्यात आलं आहे.

केंजळगडावर पर्वतारोहण करण्यासाठी सासवड, ता. पुरंदर परिसरातील रहिवासी असलेले सात ते आठ पर्यटक आले होते. यामध्ये मयांक उरणे हा आपल्या वडिलांसोबत आला होता. केजळगडावर आज सकाळी ७ वाजता पर्वतारोहणासाठी सुरुवात केली. सकाळी ८.३० ते ९ च्या दरम्यान पुढे जात असताना या चमूतील मयंक उरणे (वय १०) हा दोनशे फूट खोल दरीत कोसळून गंभीर जखमी झाला. थंड हवा, पावसाची रिप रिप, वाढलेले गवत यामुळे किल्ल्याच्या पाऊलवाटेवर दलदल झाली आहे. यामुळे मयंकचा पाय घसरून तो दोनशे फूट दरीत कोसळून खोल दरीत झाडाला धडकून झुडपात अडकला होता.

कसा लागला शोध?
मयांकचा शोध घेऊनही तो सापडत नसल्याने आसरे ते रायरेश्वदर रस्त्यावर असणाऱ्या पाखिरे वस्तीवर संबंधित पर्यटकांनी येऊन माहिती दिली. तेथील गंगाराम सपकाळ, सागर पाकीरे, सुरेश पाकीरे, रामदास पाकीरे, सचिन पाकीरे, नवनाथ पाकीरे, विलास पाकीरे, विजय पाकीरे असे सर्वजण ग्रामस्थांना सोबत घेऊन मयंक उरणे याचा शोध घेण्यास गेले असता त्यांनी खोल दरीतून त्याला गंभीर जखमी अवस्थेत शोधून बाहेर काढलं.

जखमी मयांकला वाई येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी पुणे येथे दाखल केलं आहे.

ही माहिती मिळताच पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संजय मोतेकर पोलिस नाईक यांनी आपले सहकारी शिवाजी वायदंडे, सुभाष धुळे, प्रशांत शिंदे, अमित गोळे, संजय देशमुख व संतोष शेलार आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पाखिरे वस्तीतील युवकांनी मुलाचा शोध घेऊन बाहेर काढल्याबद्दल व मदतकार्य केल्याबद्दल वाई तालुक्यातील नागरिकांनी या वस्तीतील ग्रामस्थांचे आभार मानले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here