वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारतात मंगळवारपासून रंगणाऱ्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत चीनचे मल्ल भाग घेणार नाहीत. विषाणूच्या संसर्गाच्या भितीमुळे भारत सरकारने त्यांना व्हिसा नाकारला आहे. सोमवारी भारतीय कुस्ती फेडरेशनच्या अधिकाऱ्यांकडून ही माहिती मिळाली. भारतीय कुस्ती फेडरेशनचे सहाय्यक चिटणीस विनोद तोमर यांनी दिलेल्या माहितीनुसार चीनने ४० मल्लांचा संघ भारतात पाठवण्याची तयारी केली होती अन् त्यासाठी तसा व्हिसाअर्जही करण्यात आला होता. करोना विषाणूमुळे आतापर्यंत दीड हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा बळी घेतला आहे.

तोमर यांनाही हे व्हिसा नाकारल्याची माहिती भारतीय सरकारकडूनच मिळाली आहे. ‘करोना विषाणूचे संकट हे जागतिक स्तरावरील आहे. तेव्हा आम्हाला खेळाडूंच्या तब्येतीची खबरदारी घ्यायलाच हवी. त्यामुळे सरकारने व्हिसा नाकारल्यामागील कारण आपण सगळेच समजू शकतो’, असे तोमर म्हणाले. मात्र भारतीय कुस्ती फेडरेशनला व्हिसा नाकारल्याची अधिकृत माहिती सरकारकडून अजून मिळाली नसल्याचेही त्यांनी सांगितले. चीनमधील वूहान हे करोना विषाणूचे केंद्रबिंदू असून २३ जानेवारीपासून हे शहर जवळपास बंदच आहे. बऱ्याच देशांनी येथून आपल्या नागरिकांना देशात बोलावून घेतले आहे. अनेक देशांनी चिनी पर्यटकांना व्हिसा देणे बंद केले असून चीनला विमानेही पाठवली जात नाहीत.

जागतिक कुस्तीचे म्हणणे…

भारताने व्हिसा नाकारल्याबाबत ‘वर्ल्ड युनायटेड कुस्ती’चे काय म्हणणे आहे, असे विचारल्यावर तोमर म्हणाले, ‘आम्हाला तरी यात काहीच गैर वाटत नाही. परिस्थिती सध्या इतकी गंभीर नसती आणि भारताने व्हिसा नाकारला असता, तर युनायटेड कुस्तीला हरकत असती. मात्र जीवघेण्या करोना विषाणूचा मुद्दा लक्षात घेता युनायटेड कुस्तीला या निर्णयाबाबत आक्षेप नसावा. अन् फक्त भारतातील या स्पर्धेतच असे होत नाही. इतर देशही चिनी अॅथलिटना व्हिसा नाकारत आहेत. दरम्यान युनायटेड कुस्तीकडून आम्हाला गेल्या काही आठवड्यांत आणि आताही कोणतीही सूचना आलेली नाही’. पाकिस्तानी मल्लांना भारताकडून या स्पर्धेसाठी व्हिसा देण्यात आला आहे.

चीनमधील स्पर्धाही हलवल्या

चीनमधील बऱ्याच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या असून अनेक स्पर्धांचे यजमानपद दुसऱ्या देशांना देण्यात आले आहे. महिलांची ऑलिम्पिक प्रवेशाची फुटबॉल स्पर्धाही चीनमध्ये होणार होती. जी रद्द करण्यात आली आहे. जागतिक इनडोअर अॅथलेटिक्स स्पर्धा, शांघाय एफवन ग्रांप्री आणि आशिया/ओशनिया बॉक्सिंग प्राथमिक स्पर्धा… अशा स्पर्धा दुसऱ्या देशांत हलवण्यात आल्या आहे.

बजरंग, विनेशकडून ‘सुवर्णकामगिरी’ची अपेक्षा

नवी दिल्लीः बजरंग पुनियाला ६५ किलो फ्रीस्टाइल वजनी गटात आपले जेतेपद राखायचे आहे, तर विनेश फोगटला ५३ किलो वजनी गटात सुवर्णपदक खुणावते आहे… भारतीय कुस्तीगिरांची ही सगळी तयारी सुरू आहे ती आज, मंगळवारपासून रंगणाऱ्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी. राजधानी दिल्लीतील खाशाबा जाधव स्टेडियममध्ये आठवडाभर आशियाई देशांतील मल्ल आपले कसब पणाला लावत पदकांची कमाई करण्यासाठी झुंजताना दिसणार आहेत. टोकियो ऑलिम्पिक काही महिन्यांवर असताना ही स्पर्धा आशियाई मल्लांसाठी महत्त्वाची मानली जाते आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी या स्पर्धेतील कामगिरी मल्लांना रँकिंगच्या दृष्टिने महत्त्वाची ठरणार आहे.

बजरंग आणि विनेश यांनी गेल्यावर्षी पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ब्राँझपदकाची कमाई केली आहे. त्यांच्यासह दीपक पुनिया, रवीकुमार दाहिया आणि ऑलिम्पिक पदकविजेती मल्ल साक्षी मलिकदेखील या स्पर्धेत भाग घेणार आहे. अंशू मलिक आणि अशू-सोनम मलिक हे तीन नव्या दमाचे मल्लही या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील. ही स्पर्धा फ्रीस्टाइल (पुरुष), ग्रीको-रोमन आणि महिलांची कुस्ती स्पर्धा अशा गटात होईल. त्यानंतर महिलांमधील विविध वजनी गटाच्या लढती होतील. त्यानंतर अखेरचे दोन दिवस पुरुषांच्या गटांतील फ्रीस्टाइल गटाच्या झुंजी होतील.

आधी पाकिस्तानचे मल्ल आणि दोन अधिकाऱ्यांना व्हिसा मिळेल की नाही, याबाबत साशंकता होती; पण भारत सरकारने पाकिस्तान संघ आणि अधिकाऱ्यांनाही आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी व्हिसा दिला आहे. जागतिक कुस्ती रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावरील बजरंग पुनिया म्हणाला, ‘आम्हा सगळ्या भारतीय कुस्तीगिरांसाठी ही खूप मोठी संधी आहे; कारण आम्ही आमच्या देशवासियांसमोर लढतींमध्ये भाग घेणार आहोत. काही जणांच्या मते, आम्हाला याचे दडपण येईल; पण मला विचाराल तर आपल्या देशबांधवांपुढे खेळताना आम्हा सर्वांची ताकद दुप्पट होईल. आशा आहे की आम्ही सगळेच भारताला पदकांची लयलूट करून देऊ. मी भारतीय बांधवांना विनंती करेन की त्यांनी स्टेडियममध्ये येऊन आम्हाला प्रोत्साहन द्यावे’.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here