म. टा. प्रतिनिधी
: वाढलेल्या इंधन दरामुळे प्रवासखर्चात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य कुटुंबीयांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. अशातच सामान्य नागरिकांना प्रवासासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. सर्वांना लोकलमुभा दिल्यास गर्दी वाढून करोना पुन्हा बळावण्याची भीती रेल्वे-महापालिका अधिकारी व्यक्त करीत आहेत. यामुळे तूर्त सामान्य नागरिकांना जलमय-खड्डेमय रस्त्यावरूनच प्रवास करावा लागणार आहे.

शहरात मान्सूनचे आगमन झाल्यापासून मुसळधार पावसामुळे रस्त्यांसह रेल्वे स्थानकेही जलमय झाल्याने मोठी अवघड स्थिती निर्माण होत आहे. रेल्वे स्थानके, रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याने अनेक लोकल खोळंबल्या. लोकलमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा आहे. रेल्वेच्या आकडेवारीनुसार सध्या ३० लाखांपेक्षा अधिक अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी रोज रेल्वेने प्रवास करत आहेत. अशा वेळेस सर्वांना लोकलमुभा दिल्यास गर्दीत मोठ्या प्रमाणात वाढ होईल; शिवाय त्यांच्या प्रवासाच्या अडचणीही वाढतील, असे महापालिका अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

शहरातील करोना बाधितांचा टक्का ४.४० इतका आहे. यामुळे अत्यंत सावधगिरी बाळगून महापालिका काम करत आहे. शहरातील अतिवृष्टीचा इशारा मागे घेतल्यानंतर सामान्यांसाठी लोकल सुरू करण्याचा विचार करण्यात येईल. तोपर्यंत सर्वसामान्यांनी संयम ठेवावा, असा सूर महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. कल्याण, ठाणे, डोंबिवली, बोरिवली, अंधेरी मालाड येथून मुंबईत कामासाठी येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. सध्या हा नोकरदार वर्ग रस्तेप्रवासावरच अवलंबून आहे. पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचत असल्याने रस्तेमार्गे प्रवास करताना तासनतास खोळंबून रहावे लागते. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढणार आहेत.

सरकारचा होकार, महापालिकेचा नकार

लोकल सुरू करण्याचा अधिकार राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे होता. त्यानुसार सर्व महिलांसाठी लोकल सुरू करण्याचे लेखी आदेश सरकारने दिले. गर्दीचे कारण देत सर्व महिलांना प्रवासमुभा नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. आता लोकल सुरू करण्याचे अधिकार महापालिकेकडे आहे. राज्य सरकारने पाच टप्प्यांमध्ये निर्बंधात मोकळीक देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पूर्वी तिसऱ्या टप्प्यात असलेली मुंबईची स्थिती आणखी सुधारली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here