म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

‘ ही भावना आहे. मराठी असल्याबद्दलचा अभिमान त्यातून दर्शवला जातो. मराठी संस्कृती व अस्मितेचे दर्शनही त्यातून होते. १९व्या शतकापासून मराठी वाड्मयात या शब्दांचा वापर होत आला आहे. त्यामुळे या शब्दांच्या वापरावर कोणीही आपली मक्तेदारी सांगू शकत नाही’, असा युक्तिवाद सोमवारी शेमारू एंटरटेन्मेंट कंपनीतर्फे अॅड. हिरेन कमोद यांनी मुंबई उच्च न्यायालयात न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्यासमोर केला. त्यानंतर न्यायमूर्तींनी ‘चौरंग’ संस्थेच्या अर्जावरील अंतरिम निर्णय राखून ठेवत मंगळवारी (आज) आदेश देऊ, असे स्पष्ट केले.

शेमारू कंपनीने २२ जानेवारीपासून ‘शेमारू मराठी बाणा’ ही नवी मराठी दूरचित्र वाहिनी सुरू केली आहे. त्यामुळे ‘चौरंग’चे सर्वेसर्वा अशोक हांडे यांनी अॅड. राजेंद्र पै यांच्यामार्फत दावा दाखल केला आहे आणि त्यातच ‘शेमारू’ला मनाई आदेश देण्याच्या विनंतीचा अर्ज केला आहे.

‘मराठी बाणा या १५ वर्षांपासून नावाजलेल्या आमच्या शोसाठी आम्ही मराठी बाणा या शब्दांची ट्रेडमार्क नोंदणी केलेली आहे. या कार्यक्रमाचे देश-परदेशांत मिळून सुमारे दोन हजार प्रयोग झाले आहेत. या लोकप्रिय कार्यक्रमामुळे मराठी बाणा या शब्दांची आमच्या संस्थेसोबत विशेष ओळख झालेली आहे. मात्र, या लोकप्रिय शब्दांवर स्वार होऊन आर्थिक लाभ मिळवण्याच्या हेतूनेच आणि ट्रेडमार्क कायद्याचे उल्लंघन करत शेमारूने आपल्या वाहिनीला ते नाव दिले आहे’, असा युक्तिवाद हांडे यांनी पै यांच्यामार्फत मांडला. या कार्यक्रमासंदर्भातील इतक्या वर्षांची गुंतवणूक व खर्चही दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तसेच कंपनीला ते नाव वापरण्यास मनाई आदेश द्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली.

मात्र, ‘मराठी बाणा हे शब्द लोकांकडून सर्वसाधारणपणे बोलले जात नाहीत, तर ते आपण निर्माण केले, असे म्हणणे अर्जदारांचे असेल तर ते हास्यास्पद आहे. कारण अनेक ऐतिहासिक पुस्तके, कादंबऱ्यांमध्ये या दोन शब्दांचा उल्लेख आहे. हे सर्रास वापरले जाणारे व प्रचलित शब्द आहेत. संयुक्त महाराष्ट्र चळवळीदरम्यानही आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे आदींनी या शब्दांचा वापर केला होता. इतकेच नव्हे तर आजही अनेकदा प्रसारमाध्यमांच्या बातम्यांमध्ये तसेच नेत्यांच्या तोंडीही हे शब्द असतात. त्यामुळे या शब्दांवर चौरंग आपली मक्तेदारी सांगू शकत नाही. शिवाय ट्रेडमार्कची नोंदणी ही वेगवेगळ्या प्रकारांतील असते. चौरंगने या शब्दांच्या नावानिशी जी नोंदणी केली आहे ती मंचावरील सादरीकरणाच्या कार्यक्रमासाठी आहे, तर आमची नोंदणी कार्यक्रम प्रसारणाच्या प्रकारातील आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये गोंधळ निर्माण होण्याच्या चौरंगच्या दाव्यात तथ्य नाही. शिवाय आमचा मूळ ट्रेडमार्क शेमारू असून मराठी बाणा हे शब्द केवळ वर्णनात्मक आहेत’, असा युक्तिवाद अॅड. कमोद व अॅड. महेश महाडगुट यांनी मांडला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here