: मासे पकडताना नाल्यात बुडून बहिण भावाचा मृत्यू झाला आहे. ही काळीज पिळवटून टाकणारी घटना सोमवारी सकाळी हिंगण्यातील आमगाव देवळी येथे उघडकीस आली. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. अभिषेक विलास राऊत (वय ७) आणि आरुषी विलास राऊत (वय १०) अशी मृतांची नावे आहेत.

मृत भावंडांचे आई-वडील श्रमिक असून मासेमारी हा त्यांचा पारंपारिक व्यवसाय आहे. रविवारी सकाळी विलास राऊत व त्यांच्या पत्नी कामावर गेल्या. तेव्हा त्यांची मुले अभिषेक व आरुषी या दोघांनी नाल्यात मासे पकडण्याची योजना आखली. दुपारी ४ वाजताच्या सुमारास दोघेही गावातील नाल्याजवळ गेले. अभिषेक याने कपडे काढले आणि त्यानंतर अभिषेक व आरुषी मासे पकडण्यासाठी नाल्यात उतरले. नाल्यात गाळ असल्याचे त्यांना माहिती नव्हते.

मासे पकडताना दोघेही गाळात अडकले. मदतीसाठी त्यांनी जीवाच्या आकांताने आरडाओरड केली. मात्र नाल्याजवळ कोणीच नसल्याने त्यांना मदत मिळाली नाही. अखेर नाल्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला.

दरम्यान, विलास व त्यांच्या पत्नी घरी आले. त्यावेळी दोन्ही मुले त्यांना घरी दिसली नाहीत. त्यानंतर विलास व त्यांच्या नातेवाइकांनी ताबोडतोब दोघांचा शोध सुरू केला, मात्र ते आढळून आले नाहीत. सोमवारी सकाळी पुन्हा विलास ,त्यांचे नातेवाइक व गावकऱ्यांनी अभिषेक आणि आरुषीचा शोध सुरू केला तेव्हा नाल्याजवळ अभिषेक याचे कपडे आढळून आले.

घटनेची माहिती हिंगणा पोलिसांना देण्यात आली. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारीन दुर्गे यांच्यासह पोलिसांचा ताफा गावात पोहोचला. गावातील युवकांच्या मदतीने नाल्यात शोध घेतला असता अभिषेक व आरुषीचे मृतदेह आढळून आले. एकाच वेळी दोन अपत्यांच्या मृत्यूने राऊत कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बहिण-भावाचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली. या प्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here