शीव उड्डाणपुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर या पुलाचे बेअरिंग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. पुलाचे बेअरिंग बदलण्याचे काम दोन महिने सुरू राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक आठवड्यातील चार दिवस हा पूल बेअरिंग बदलण्याच्या कामासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. गेल्या आठवड्यात चार दिवस हा पूल बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे या मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. या पुलाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झाल्यानंतर आज पहाटे सहा वाजता या उड्डाणपुलावरील एक मार्गिका सुरू करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईकडे जाणारी मार्गिका अद्यापही बंद ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
वाहतुकीच्या दृष्टीने शीव उड्डाणपुलाचे महत्त्व लक्षात घेता आठवड्यातील केवळ चार दिवस बेअरिंग बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी एकूण आठ ट्रॅफिक ब्लॉक मुंबई वाहतूक विभागाकडून मंजूर करण्यात आले आहे. यापैकी, पहिला ब्लॉक १४ फेब्रुवारीला पहाटे ५ ते १८ फेब्रुवारी पहाटे ६ वाजेपर्यंत पार पडला असून पुढील ब्लॉक २० ते २४ फेब्रुवारी या कालावधीत असेल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने हे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे उड्डाणपुलाखाली भागात वाहतुककोंडी होणार नाही यासाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष काळजी घेण्यात येणार आहे, असं सूत्रांनी सांगितलं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times