: (Mucormycosis) अर्थात काळ्या बुरशीचा संसर्ग झाल्याने लोणीतील रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्रद्धा कोरके (वय पाच महिने) या मुलीचा मृत्यू झाला आहे. म्युकरमायकोसिसचा राज्यातील सर्वांत कमी वयाचा रुग्ण म्हणून या बाळाच्या उपचारांकडे लक्ष लागलं होतं. एवढ्या कमी वयाच्या बाळावर शस्त्रक्रिया करणंही शक्य नव्हते. औषधोपचारावरच डॉक्टरांचा भर होता. मात्र मंगळवारी सकाळी बाळाचा मृत्यू झाला.

शिर्डीतील या बाळाला प्रथम करोना आणि नंतर काळ्या बुरशीचा संसर्ग झाला होता. नाशिकनंतर लोणीतील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात श्रद्धावर उपचार सुरू होते. रविवारी १३ जूनला प्रवरा ग्रामीण रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. तेथे बालरोग विभागातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले. आल्यापासून श्रद्धाला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. बुरशीचा संसर्ग वाढून चेहऱ्यासह अन्य अवयवांवर पसरला होता. ती औषधोपचारांना प्रतिसाद देत नव्हती.

मोठया रुग्णांमध्ये बुरशी काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रियेचा पर्याय असतो. मात्र, रुग्णाचे वय व प्रकृती विचारात घेता तोही शक्य नव्हता. त्यामुळे औषधोपचाराशिवाय दुसरा पर्याय नव्हता. श्रद्धा ही येथे दाखल झाल्यापासून तिने उपचारांना प्रतिसाद दिलाच नाही, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. पालकांनी आपल्या लहान मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

म्युकरमायकोसिसच्या आडाख्यांना छेद देणारी घटना!
शिर्डीतील या बाळाचे उदाहरण काळ्या बुरशीच्या (म्युकरमायकोसिस) आजारासंबंधी आतापर्यंत बांधण्यात आलेल्या आडाख्यांना छेद देणारे ठरले. या बाळाला लक्षणे विरहित करोना झाला आणि बराही होऊन गेला होता. त्रास होऊ लागल्यानंतर तपासणी केल्यावर करोना आधीच होऊन गेल्याचे आढळून आले होते. मात्र, त्यानंतर काळ्या बुरशीची लक्षणे आढळून आली. करोनाचा संसर्ग आणि त्यासाठी घेतलेल्या उपचारांनंतर साधारणपणे या आजाराचे रुग्ण आढळून आल्याची आतापर्यंतची उदाहरणे आहेत. याशिवाय एवढ्या कमी वयात हा आजार होऊ शकतो, हेही यातून पुढे आले आहे.

या बाळाला २७ मे रोजी जुलाब आणि उलट्यांचा त्रास होत असल्याचे आढळून आले. कोपरगावमधील एका खासगी रुग्णालयात काही काळ उपचार करण्यात आले. त्यानंतर नाशिकला नेण्यात आले. तिची करोना चाचणी मात्र निगेटिव्ह आली होती. मात्र, रक्त तपासणी केली असता तिच्यामध्ये अँटीबॉडीज तयार झाल्याचे आढळून आले. त्यामुळे तिला लक्षणे विरहीत करोना होऊ गेल्याचे निदान डॉक्टरांनी केले होते. नंतर काळ्या बुरशीचीही लक्षणे आढळून आली होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here