: एका युवकाने थेट पेट्रोलची बाटली घेऊन ग्रामपंचायतीत दाखल होत आत्मदहनाचा इशारा दिल्याची घटना अमरावती जिल्ह्यात घडली आहे. ग्रामपंचायतीला मागितलेल्या लेखी उत्तराला वारंवार केराची टोपली दाखवल्यामुळे युवकाने हे पाऊल उचलल्याची माहिती आहे. निलेश रघुवंशी असं सदर युवकाचं नाव आहे.

नांदगांव पेठ येथील एका खुल्या जागेवर क्रीडा मंडळाचे खेळाडू कबड्डी खेळत असल्याने ग्रामपंचायतीने त्यांना जागा खाली करण्यासाठी नोटीस देऊन पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणावरून खेळाडू आणि ग्रामपंचायतीमध्ये वाद निर्माण झाला असल्याचे समजते.

बाळापूरे ले आऊट स्थित एका खुल्या जागेवर वीर केसरी क्रीडा व शिक्षण मंडळाद्वारे खेळाडू दररोज कबड्डी खेळत आहेत. सदर जागेवर स्व. दत्तात्रय पुसदकर महाविद्यालयाची इमारत असून या जागेसंबंधी महाविद्यालय व वीर केसरी मंडळ यांच्यात कायदेशीर लढाई सुरू आहे. विभागीय आयुक्तांनी महाविद्यालयाच्या बाजूने निकाल दिला तर ग्रामपंचायतीने जागेसंबंधी मंडळाला ठराव दिला होता. असं असताना सदर जागेसंबंधी विभागीय आयुक्तांनी जागा खाली करण्याचे आदेश मंडळाला दिले आहेत, मात्र या प्रकरणात ग्रामपंचायत हस्तक्षेप करीत असून पदाधिकाऱ्यांना मानसिक त्रास देत असल्याचा आरोप मंडळाचे पदाधिकारी निलेश रघुवंशी यांनी केला आहे.

पोलिस संरक्षणात जागा खाली करण्याचा ठराव मासिक बैठकीत घेतला आहे का, अशी विचारणा निलेश रघुवंशी यांनी केली. मात्र रघुवंशी यांना ग्रामपंचायतीच्या वतीने कोणतेही लेखी उत्तर देण्यात येत नसून केवळ टाळाटाळ करण्यात येत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या युवकाने आज पेट्रोलची बाटली घेऊन ग्रामपंचायतीत प्रवेश केला आणि माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या अन्यथा मी आत्मदहन करतो असा पवित्रा घेतला आहे.

सरपंचांनी नेमकं काय उत्तर दिलं?
‘विभागीय आयुक्त यांच्या आदेशांचा सन्मान करत बाळापूरे ले आउट मधील खुल्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी गेले असता त्याठिकाणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी वाद करून कर्मचाऱ्यांना हाकलून लावले. त्यामुळे नाईलाजाने पोलिस तक्रार करावी लागली. ही सर्व प्रक्रिया ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या सहीसोबत झालेली असून त्या सध्या रजेवर असल्याने निलेश रघुवंशी यांच्या प्रश्नाचे उत्तर देणे शक्य नाही. ग्रामपंचायत कोणत्याही प्रकारची मनमानी करीत नसून ग्रामविकास अधिकारी रुजू झाल्यानंतर त्यांना लेखी उत्तर देण्यात येईल,’ अशी माहिती सरपंच यांनी दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here