यासंदर्भात उत्पादकांनी आता नियम बदलल्याचे सांगितले;तर काही रुग्णालयांनी लशींचा साठा नसल्याचे उत्तर दिले. या केंद्रांच्या उभारणीसाठी या खासगी रुग्णालयांना वेगळी वैद्यकीय तयारी करावी लागली होती.मात्र, मागील दीड महिन्यांपासून त्यांच्याकडे लसीकरण मोहीम राबण्यासाठी सातत्याने विचारणा होत असली, तरीही लशींची उपलब्धता नसल्यामुळे त्यांना होकार देता येत नाही, अशी अडचण खासगी रुग्णालयांच्या वरिष्ठ वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली. या केंद्रांच्या उभारणीसाठी केलेला खर्च, तसेच इतर नियोजनाचे आता काय करायचे, हा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
लघु व मध्यम स्वरूपाच्या रुग्णालयांनी एकत्र येऊन लसीकरणासाठी नोंदणी केली होती.मात्र, मोठ्या रुग्णालयांना लशी मिळाल्या.लहान व मध्यम स्वरूपाच्या रुग्णालयांना त्या मिळाल्या नाहीत. यातील काही रुग्णालयांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना विनंती केल्यानंतर लशींची उपलब्धता झाली. त्यामुळे लसीकरणामध्ये नियमांचे निकष सर्वांना सारखे नाहीत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
लसीकरणाचे नवीन धोरण आल्यानंतर आता २५ टक्के लशींची उपलब्धता ही सरकारच्या माध्यमातून खासगी रुग्णालयांना होणार आहे. मात्र, कोणत्या रुग्णालयांना यामध्ये किती लशी उपलब्ध होणार याची स्पष्टता देण्यात आलेली नाही. ही नवी नियमावली २१ जूनपासून लागू होणार असल्यामुळे त्यात प्राधान्यक्रम कसा लावणार, असा प्रश्न आरोग्यऊर्जा संस्थेच्या व्ही. एम. पाटील यांनी उपस्थित केला.
नव्या नियमांनुसार वाटप
पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी लशींचे वाटप हे पहिल्या टप्प्यात केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार करण्यात आल्याचे सांगितले.नवे नियम २१ जूनपासून लागू होणार आहेत. त्यामुळे त्यानुसार सरकार या रुग्णालयांना लशींची उपल्बधता करून देईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times