म. टा. प्रतिनिधी, पुणेः धानोरी परिसरात राहणाऱ्या माय-लेकरांचा खून करून, मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी समोर आला. महिलेचा मृतदेह पहाटे पुरंदर तालुक्यातील खळद गावच्या हद्दीत आढळून आला, तर तिच्या सहा वर्षाच्या मुलाचा मृतदेह नवीन कात्रज बोगदा परिसरात जांभुळवाडी येथे महामार्गानजीक एका हॉटेलजवळ मंगळवारी सायंकाळी आढळला.

सासवड व भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यांत या प्रकरणी खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आयान शेख (वय ६) आणि त्याची आई आलिया आबिद शेख (वय ३५) अशी खून झालेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही धानोरी परिसरात राहत होते. आलिया यांचा मृतदेह सासवड-जेजुरी रस्त्यावरील खळद येथे एका हॉटेलसमोर मंगळवारी सकाळी आढळला होता. सासवड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले की, खळद जवळ सापडलेल्या महिलेचे नाव आलिया शेख असल्याचे समजले. त्यांच्या गळ्यावर वार करून खून केल्याचे आढळून आले. महिलेचा फोटो आम्ही व्हॉट्‌‌सअ‍ॅप ग्रुपवर पाठवला होता. त्याची माहिती मिळाल्यावर त्यांचे नातेवाइक मंगळवारी सायंकाळी पोलिस ठाण्यात आले होते. त्यांनी महिलेला ओळखले आहे. दोन दिवसांपूर्वी ही महिला तिचा पती व मुलागा कारमधून फिरायला गेले होते. तेव्हापासून त्यांचा पत्ता लागत नव्हता.

दोन दिवसांपूर्वी ही महिला तिचा पती व मुलाबरोबर कारमधून फिरायला गेले होते. या घटनेनंतर महिलेच्या पतीचा अद्याप कोठेही पत्ता लागलेला नाही.
भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळस्कर म्हणाले, ‘जांभुळवाडी गावाच्या हद्दीत महामार्गाच्या कडेला मंगळवारी सायंकाळी एका मुलाचा मृतदेह नागरिकांना आढळला. नागरिकांना पोलिसांना कळवल्यावर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले. मुलाचा गळा आवळून खून केल्याचे यात निष्पन्न झाले. त्या वेळी मुलाचा शोध घेत काही नातेवाइक आले होते. त्यामुळे त्याची ओळख पटवण्यात यश आले. हा खून कोणी व का केला, हे स्पष्ट झालेले नाही.

मुलाचा खून करून त्या ठिकाणी मृतदेह टाकला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिसांची पथके तपास करीत आहेत. संबंधितांची कार पुणे-सातारा रस्त्यावर आढळली असून, पोलिस महिलेच्या पतीचा शोध घेत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here