म. टा. प्रतिनिधी मुंबई : अधिकृतपणे सर्वसामान्यांना लोकलमुभा नसली तरी परवानगी नसताना असंख्य नागरिक मुंबई लोकलने प्रवास करत आहेत. जूनच्या पहिल्या पंधरवड्याअखेर मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील प्रवासी संख्या ३१ लाखांपर्यंत पोहोचली आहे. रोजगाराची चिंता सतावत असताना प्रवास खर्च कमी करण्यासाठी अनेक नागरिक लोकल प्रवासाला प्राधान्य देताना दिसत आहेत.

पेट्रोलच्या शंभरी ओलांडल्यामुळे १५ ते २० हजार रुपये पगार कमावणाऱ्या सामान्य मुंबईकरांना दुचाकीचा रोजचा खर्चही पेलवेनासा झाला आहे. घराचे हप्ते, ऑनलाइन शिक्षणासाठी वाढलेला इंटरनेट खर्च, दैनंदिन घरखर्च ही वाढत असल्याने अर्थव्यवहार सांभाळताना गृहिणींची मोठी ओढाताण होत आहे. या सर्व स्थितीवर सरकारकडून केवळ बघ्याची भूमिका घेण्यात येत असल्याने सर्वसामान्यांमध्ये प्रचंड रोष आहे.

मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर ५ जूनला ११ लाखांहून अधिक प्रवासाची नोंद झाली. १० जून रोजी ही प्रवासी १२ लाख ५० हजारांपर्यंत पोहोचली. १५ जून रोजी अंदाजे १५ लाखांच्या आसपास प्रवासी संख्या असल्याचे कळते. पश्चिम रेल्वेवरील लोकलमधून ५ जून रोजी साडे नऊ लाख प्रवाशांनी प्रवास केला. १० जूनला १३ लाख तर १५ जूनला १६ लाख प्रवाशांनी प्रवास केल्याचे समजते.

कल्याण-डोंबिवलीहून मुंबई गाठण्यासाठी साधारणपणे ४०० रुपये खर्च होतो. लोकलने हाच प्रवास २० रुपयांत पूर्ण होतो. शिवाय रस्तेमार्गे हे अंतर कापण्यासाठी दोन ते तीन तास लागतात. निर्बंध शिथिल केले असले तरी अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचा पगार पूर्ववत केला नाही. किमान स्वस्त प्रवासाची तरी मुभा देऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी मुंबईकरांमधून होत आहे.

मध्य रेल्वेवरील प्रवासी
५ जून : ११ लाख

१० जून : १२ लाख ५० हजार

१५ जून : १५ लाख

पश्चिम रेल्वेवरील प्रवासी

५ जून : ९ लाख ५० हजार

१० जून : १३ लाख

१५ जून : १६ लाख

दबाव वाढू लागला…

दहावीच्या निकालासाठी शिक्षकांना शाळेत येणे बंधनकारक करण्यात आले. मात्र लोकल प्रवासाची परवानगी नसल्याने शिक्षकांनी आंदोलन केले. आंदोलनाच्या २४ तासांनंतर ही शिक्षकांच्या लोकल प्रवासाबाबत निर्णय झालेला नाही. लोकलची उणीव भरून काढण्यासाठी महापालिकेने बेस्ट मार्गासाठी १००० एसटी सुरू केल्या. आता आवश्यकता नसल्याचे सांगत या गाड्या बंद करण्यात आल्या. खासगी-सरकारी आस्थापनांमधून कामकाज सुरू करण्यासाठी दबाव वाढत आहे. सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवेश खुला केला नसल्याने कर्मचारी कामावर पोहोचणार कसे हा प्रश्न आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here