मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसाच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी नाणारबाबतची भूमिका स्पष्ट केली. नाणार रिफायनरीबाबत शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक सामनातून जाहिरात आली होती. पण शिवसेनेचे धोरण आणि भूमिका मी ठरवत असतो. ते सामनातून मांडले जातात. कोणताही जाहिरातदार शिवसेनेचे धोरण ठरवत नाही, असं सांगतानाच नाणार प्रकल्प बंद आहे. तो सुरू होणार नाही. जाहिरातीमुळे शिवसेनेची भूमिका बदलत नाही. बदलणार नाही. नाणारला विरोध हा कायमच राहणार, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्गासाठी सिंधुरत्न समृद्ध विकास योजना ही नवीन योजना सुरू केली. या योजनेतून हॉस्पिटल, पूर, पर्यटन, नळपाणी योजना, घरबांधणी, दुष्काळ आणि डिझेलचा परतावा आदी कामे केली जाणार आहेत. कोकणात एलईडी मासेमारीमुळे दुष्काळ निर्माण होतो. मोठी धेंडं परस्पर मासेमारी करतात. त्यामुळे दुष्काळ पडतो. हा प्रश्न सोडवण्यासाठी कोस्टगार्डशी चर्चा केली असून त्यातून मार्ग काढण्यात येत असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. दर सहा महिन्याला जिल्ह्यांच्या ठिकाणी बैठका घेण्यात येणार आहे. त्या परिसरातील प्रश्नमार्गी लागावेत आणि स्थानिक आमदारांनाही त्यांच्या समस्या मांडत्या याव्यात यासाठी या बैठका होणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी खासदार विनायक राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब आणि उदय सामंत आदी मान्यवर उपस्थित होते.
Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines