नागपूर शहरातील मेडिट्रिना रुग्णालयात सुरू असलेल्या या ट्रायलच्या दुसऱ्या टप्प्यात ६ ते १२ वयोगटातील २५ स्वयंसेवक मुलांना बुधवारी लसीचा पहिला डोस देण्यात आला. मुलांवरील लसीचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी शहरातील विविध क्षेत्रातील पालकांनी आपल्या मुलांना लसीचा डोस देण्याची तयारी दर्शविल्याने ३५ मुलांचं स्क्रिनिंग करण्यात आलं. त्यातून निवडलेल्या २५ मुलांना लशीचा पहिला डोस देण्यात आला.
डॉक्टर, शिक्षक, पत्रकार अशा विविध क्षेत्रातील पालकांनी त्यासाठी स्वत:हून पुढाकार घेतला. भारत बायोटेकनं यापूर्वीही केलेल्या लसीच्या ह्युमन ट्रायलमध्ये नागपूरनं सहभाग नोंदविला होता. आता मुलांवरील कोव्हिड लसीच्या ट्रायलमध्येही नागपूरची निवड झाली आहे. पहिल्या टप्प्यात १२ ते १८ वयोगटातील ४१ मुलांना दिलेल्या पहिल्या डोसच्या मात्रेचे सकारात्मक परिणाम मंगळवारी समोर आले होते. लस दिलेल्या मुलांना कोणतीही रिअॅक्शन न आल्यानं बुधवारी दुसऱ्या फेरीतील ६ ते १२ वयोगटातील मुलांना लशीचा पहिला डोस देण्यात आला.
तीन टप्प्यांत होतेय ट्रायल
लहान मुलांवरील कोव्हॅक्सिन लसीची मेडिट्रेना रुग्णालयात ती टप्प्यांमध्ये ट्रायल घेतली जात आहे. पहिल्या टप्प्यात ४१ मुलांना लशीचा पहिला डोस दिला गेला. दुसऱ्या टप्प्यात ६ ते ११ आणि तिसऱ्या टप्प्यात २ ते ६ वयोगटातील मुलांवर ही ह्यूमन ट्रायल होईल .
मुलांवरील लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील ट्रायलसाठी ११० मुलांचं रजिस्ट्रेशन झालं होतं. त्यातील २५ मुलांचं स्क्रिनिंग करून त्यांची लसीचा पहिला डोस देण्यासाठी निवड झाली. पहिला डोस दिल्यानंतर २८ दिवसांनी पुन्हा त्यांना दुसरा डोस दिला जाईल.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times