विकास सुरिंदर कपूर (रा. साधनगर, पालम गाव, दिल्ली) असं अटक केलेल्या भामट्याचं नाव आहे, तर वामन काशिराम महाजन (रा. अंतुर्ली, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) असं फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.
नेमकं काय घडलं?
विकास कपूर याच्यासह पंकज कुमार, हरबंसलाल, कविता, समीर मेहरा, शुक्ला, एस. पी. सिन्हा, रिया मेहता (बनावट नावे) यांनी सन २०१४ पासून महाजन यांना फोन करण्यास सुरूवात केली. एसबीआय लाईफ इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंडातून पैसे दुप्पट करुन देण्यासाठी त्यांनी महाजन यांना आमिष दाखवले. महाजन यांनी शेतीतून झालेले उत्पन्न, निवृत्तीनंतर मिळालेले सर्व पैसे या भामट्यांना वेळोवेळी बँक खात्यात पाठवले. या आरोपींनी सन २०१९ पर्यंत त्यांच्याकडून वेगवेगळे आमिष देऊन पैसे मागवले.
यात महाजन यांना कोणत्याही प्रकारचा लाभ झाला नाही. पैसे दुप्पट करुन मिळाले नाही. यामुळे फसवणूक झाल्याचे निष्पन्न होताच महाजन यांनी पैसे देणे बंद केले. तसंच संबधितांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी हा गुन्हा सायबर पोलिसांकडे तपासाला दिला होता.
भामट्यांनी महाजन यांच्या विविध ३५ बँकांच्या खात्यातून पैसे काढून घेतले होते. याची माहिती सायबर पोलिसांनी घेतली आणि भामट्यांनी वापरलेले एटीएम कार्ड, मोबाईल याची तांत्रिक माहिती घेतल्यानंतर सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बळीराम हिरे यांनी विकास कपूर याचा पत्ता मिळावला होता. त्यानुसार गेल्या आठवड्यात पोलिसांनी दिल्ली येथे जाऊन सापळा रचला. तीन दिवस प्रयत्न केल्यानंतर त्यांनी विकास कपूर याला ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर कपूर याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला अटक करुन जळगावात आणण्यात आले आहे. न्यायालयात हजर केले असता त्याला २५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सायबर पोलिस पुढील तपास करत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times