मुंबई : मागीलवर्षी करोनाची पहिली लाट व त्यानंतर आता दुसऱ्या लाटेतील निर्बंधांत व रेस्तराँ क्षेत्राचे जबर नुकसान झाले आहे. एकट्या मुंबईतील ४० टक्के रेस्तराँ बंद पडले आहेत. त्यामुळेच आता व्यवसाय वाढीसाठी हॉटेल तसेच रेस्तराँची वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांनी मुंबई महापालिका तसेच राज्य सरकारकडे केली आहे.
मुंबई शहर व उपनगरात जवळपास ७५ हजार लहान-मोठे रेस्तराँ आहेत. ५ हजार मोठे रेस्तराँ आहेत. ७५ हजारांपैकी ४० टक्के अर्थात सुमारे ३० हजार रेस्तराँ, धाबे मागील लॉकडाउन व आताच्या निर्बंधांत बंद पडले. या ३० हजार रेस्तराँमधील किमान तीन लाख कर्मचारी, वेटर झाले आहेत. त्यानंतर उर्वरित हॉटेल व रेस्तराँ हिमतीने उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण त्यासाठी त्यांना वेळ वाढवून मिळण्याची नितांत गरज असल्याचे हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे. याबाबत हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे (हारवी) अध्यक्ष शेरी भाटिया यांनी सांगितले, ‘हॉटेल क्षेत्र पूर्णपणे कर्जाच्या ओझ्याखाली आहे. हॉटेल्स आणि रेस्तराँ पुन्हा सुरू करण्यासाठी आणि पुनरुज्जीवित करण्यासाठी उद्योगात स्थिरता असणे आवश्यक आहे. रेस्तराँना सध्या सकाळी ११ ते दुपारी चारची वेळ दिली गेली आहे. ही वेळ काहीच उपयोगाची नाही. या निर्बंधांमुळे व्यवसायाची स्थिती भीषण झाली आहे. केंद्र व राज्य सरकारकडून आमच्या उद्योगास कोणताही ठोस दिलासा न मिळाल्यामुळे कार्यशील भांडवलासाठी रोख रक्कमेची उभारणी, कर्मचाऱ्यांची जमवाजमव, मालमत्तेची देखभाल आणि वैधानिक शुल्काची भरपाई अशा सर्व गंभीर समस्या आमच्यापुढे उभ्या आहेत. बँकांनीदेखील आदरातिथ्य उद्योगाला नकारात्मक कर्ज श्रेणीच्या यादीत समाविष्ट केले आहे. मुंबईत हॉटेल व रेस्तराँ यांना वेळ वाढवून मिळाल्यास, या समस्यांचा सामना करता येईल.’
हॉटेल उद्योग संकटात
मुंबईतील हॉटेल उद्योग लॉकडाउनमुळे मार्च, २०२०पासून जवळपास बंदच आहे. या १५ महिन्यांत निर्बंधांसह चार ते पाच महिन्याच्या थोडक्या कालावधीसाठी रेस्तराँना उघडण्याची परवानगी देण्यात आली होती. पण अन्य कुठल्याही सवलती न मिळाल्याने राज्यातील जवळपास २.१० लाख रेस्तराँ व १० हजार ५०० हॉटेल संकटात आहेत, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times