सिंधुदुर्ग: कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि प्रकरण या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. केंद्र सरकारने एल्गार परिषदेचा तपास स्वत:कडे घेतला आहे. कोरेगाव-भीमाचा नाही, असं सांगतानाच कोरेगाव-भीमात दलित बांधवांवर अत्याचार झाला असून हा तपास केंद्राकडे कोणत्याही परिस्थितीत देणार नाही, असं मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं.

सिंधुदुर्ग येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी कोरेगाव-भीमा प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली. केंद्र सरकारने एल्गार परिषदेचा तपास स्वत:कडे घेतला आहे. कोरेगाव-भीमा हिंसाचाराचा तपास काढून घेतलेला नाही. माझ्या दलित बांधवाचा जो विषय आहे तो भीमा कोरेगावबाबत आहे आणि भीमा कोरेगावचा तपास मी केंद्राकडे दिलेला नाही, तो केंद्राकडे देणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीची बैठक पार पडली होती. त्यात एल्गार परिषद आणि कोरेगाव-भीमा प्रकरणावर चर्चा झाली. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेवर नाराज असल्याचंही बोललं जात होतं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे विधान केलं आहे. त्यामुळे एल्गार परिषद प्रकरणावरून राष्ट्रवादी काय भूमिका घेते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

उद्धव ठाकरे यांनी एनआरसी, सीएए आणि एमपीए हे तिन्ही विषयही वेगवेगळे असल्याचं सांगत त्यावर भाष्य करून शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. तसेच नाणार रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असून हा विरोध कायम राहणार आहे. त्यामुळे नाणार प्रकल्प सुरू होण्याचा प्रश्नच येत नसून हा प्रकल्प मी सुरू होऊ देणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. त्याशिवाय सिंधुदुर्गासाठी सिंधुरत्न समृद्ध विकास योजना ही नवीन योजना सुरू करण्यात येत असल्याची घोषणाही त्यांनी केली. या योजनेतून हॉस्पिटल, पूर, पर्यटन, नळपाणी योजना, घरबांधणी, दुष्काळ आणि डिझेलचा परतावा आदी कामे केली जाणार आहेत, असं ते म्हणाले. यावेळी खासदार विनायक राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहन मंत्री अनिल परब आणि उदय सामंत आदी मान्यवर उपस्थित होते.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here