एल्गार परिषद प्रकरणाचा तपास केंद्र सरकारला देण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं समांतर चौकशीची भूमिका घेतली आहे. त्यासाठी गृहखात्याच्या अखत्यारित स्वतंत्र एसआयटी स्थापन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काल झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही त्यास अनुकूलता दर्शवली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी संपूर्ण प्रकरणावर पुन्हा एकदा भाष्य केलं.
‘कोरेगाव-भीमा’ हिंसाचार आणि एल्गार परिषद ही दोन्ही वेगळी प्रकरणं आहेत, असं त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं. एल्गार परिषदेचा कोरेगाव-भीमाशी संबंध जोडण्यात आला. इतकंच नव्हे, तर त्या परिषदेला हजर नसलेल्या लोकांनाही त्यात गोवण्यात आलं. त्यांच्यावर खटले भरून त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं. त्यात काही पोलिसांचाही हस्तक्षेप होता. त्यामागे काही सरकारी अधिकारी होते, त्यांच्याबद्दल आमची तक्रार आहे. याची चौकशी झाली पाहिजे, असा आमचा आग्रह आहे. तशी चौकशी झाल्यास सत्तेचा गैरवापर करणारे उघडे पडतील,’ असं पवार म्हणाले. ‘राज्य सरकारकडं आमचं म्हणणं आम्ही लेखी मांडलं आहे. आता सरकार काय करेल ते करेल. पण मागच्या सरकारनं जे केलं ते लोकांसमोर यायला हवं,’ अशी आमची भूमिका असल्याचं ते म्हणाले.
संभाजी भिडेंनी वातावरण बिघडवलं!
‘कोरेगाव-भीमामध्ये लोक अभिवादनासाठी जमत असतात. अनेक वर्षांपासून हे होत आलंय. तिथं बाहेरून येणाऱ्यांमध्ये आणि स्थानिकांमध्ये कधीही कटुता नव्हती. संभाजी भिडे यांनी तिथं वेगळं वातावरण निर्माण केलं,’ असा आरोप शरद पवार यांनी केला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times