भाजपच्या बैठकीसाठी आमदार गिरीश महाजन जळगावात पक्ष कार्यालयात आले असताना त्यांनी राम मंदिराच्या मुद्यावरुन पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका मांडली. यावेळी महाजन म्हणाले की, ‘राम मंदिराच्या मुद्द्यावरुन केवळ विरोधाला विरोध करत आहे. काल जे झाले ते अतिशय वाईट आहे. शिवसेना आपल्या मुख्य तत्वापासून बाजूला जाऊन अशी भरकटेल असा आम्ही स्वप्नात देखील विचार केला नव्हता.’
‘इतकी अधोगती कधीही झाली नव्हती’
‘काँग्रेस आणि एमआयएमच्या पुढे जात शिवसेनेने हिंदुत्वाविरोधी काम करण्यास सुरुवात केली असे वाटायला लागले आहे. प्रभू श्री रामचंद्र हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांचे मंदिर व्हावे म्हणून संपू्र्ण देशाने, मुस्लिमांनीही त्याचे स्वागत केले आहे. मात्र, हे शिवसैनिक वाटेल तसे तोंडसुख घेत आहेत. त्यांनाही माहीत आहे, विषय काय आहे? पण विरोधाला विरोध करावा म्हणून कुठल्याही विषयावर बोलायचे यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही. इतकी अधोगती शिवसेनेची कधीही झाली नाही, ती आज बघत आहोत,’ असा टोलाही महाजन यांनी यावेळी लगावला.
‘श्री राम मंदिरावरुन काल भाजपाचा मोर्चा गेला असता, सर्व शिवसैनिक तेथे जमले आणि त्यांनी हाणामारीला सुरुवात केली. सर्वांनी ते पाहिले आहे. कुणी विरोधात बोलले तर आम्ही त्याचे उत्तर गुद्दयाने देऊ, लाठीकाठीने देऊ ही भूमिका सत्ताधारी शिवसेनेची झाली आहे आणि ती चुकीची आहे,’ असंही महाजन यांनी सांगितलं आहे.
मुख्यमंत्र्यांवरही साधला निशाणा
‘करोनाच्या काळात गेल्या पंधऱ्या महिन्यात मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयाची पायरी ओलांडलेली नाही. या विषयावर काय बोलावे हेच कळत नाही. मुख्यमंत्री इतके दिवस मंत्रालयाचे तोंड बघत नसतील तर कसे कामे होणार ? फायलींचे ढीगच्या ढीग पडलेले आहेत. त्याच्यावर कसे कामे होणार?’ असा सवाल करत गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर करोना काळातील कामगिरीवरून टीकास्त्र सोडलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times