यवतमाळ : जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू आहे. याच संधीचा फायदा घेत बोगस बियाणे विक्रेते सक्रीय झाले असून, कृषी विभाग व ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल १९ लाखांच्या कपाशीच्या (एचटीबिटी) अवैध बियाण्यांसह २९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी रवींद्र जनार्धन बंधाटे (२८) रा. वटबोरी, ता. कळंब यास अटक करण्यात आली.

बुधवारी रात्री यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक जोडमोहा ते यवतमाळ मार्गावर गस्त घालत असताना सहायक फौजदार भगवान बावणे यांना एक संशयास्पद चारचाकी (क्र. एमएच २७, बीव्ही ६३६२) आढळली. पोलिसांनी पाठलाग करून हे वाहन रोखले. त्याची तपासणी केली असता, त्यात २६ पोत्यांमध्ये १९ लाख १८ हजार ९८५ रूपये किंमतीचे ८६४ किलो कापसाचे बियाणे आढळले. शिवाय बियाणे पॅकिंगकरीता छपाई केलेली दोन हजार रिकामी प्लास्टिक पाकीटे आढळली.

वाहन चालक रवींद्र बंधाटे हा याबद्दल कोणतीही माहिती व्यवस्थित देऊ शकला नाही. त्यामुळे पोलिसांनी हे वाहन ग्रामीण पोलीस ठाण्यात आणले व कृषी विभागास माहिती दिली. आज गुरूवारी सकाळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नवनाथ कोळपकर, कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, कृषी अधिकारी पंकज बरडे, बियाणे निरीक्षक नीलेश ढाकुलकर आदींनी ग्रामीण पोलीस ठाण्यात जाऊन या बियाण्यांची तपासणी केली असता, हे अप्रमाणित बियाणे विकून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा उद्देश असल्याचे निष्पन्न झाले.

खते खरेदी करून रितसर पावती घ्यावी…
त्यामुळे निलेश ढाकूलकर यांच्या तक्रारीवरून वाहन चालक रवींद्र बंधाटे याच्याविरोधात महाराष्ट्र कापूस बी बियाणे अधिनियम, पर्यावरण संरक्षण कायद्यासह भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी अटक केली. तसेच अवैध बियाण्यांसह रिकामी पाकिटे, चारचाकी वाहन असा २९ लाख २८ हजार ९८५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत असून यामागे मोठे रॅकेट असल्याचे सांगण्यात येते आहे. जिल्ह्यात सध्या अवैध बियाणे व खतांची विक्री करणारे मोठे रॅकेट सक्रिय झाले आहे. गेल्या १५ दिवसांतील ही तिसरी मोठी कारवाई आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रमाणित बियाणे, खते खरेदी करून रितसर पावती घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

१ लाख ५० हजार हेक्टरवर तुरीची लागवड होण्याची शक्यता
कपाशीची सर्वाधिक लागवड होणार जिल्ह्यात यंदा साडेनऊ लाख हेक्टरवर पेरणी होणार आहे. त्यामध्ये सर्वाधिक ४ लाख ५८ हजार हेक्टरवर कापसाची लागवड केली जाणार आहे.२ लाख ७७ हजार हेक्टरवर सोयाबीन, तर १ लाख ५० हजार हेक्टरवर तुरीची लागवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.त्या अनुषांगाने नियोजन सुरू असताना परवानगी नसलेले, बियाणे, खते मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात येत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here