शिवसेनेचेच्या ५५व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेचे कुडाळमधील भारत पेट्रोलपंपावर पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलन आयोजित केले होते. आमदार वैभव नाईक यांच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांना १०० रुपयांत २ लिटर पेट्रोल प्रति वाहन देण्यात येणार होते. या आंदोलनात सर्वसामान्यांप्रमाणेच भाजप सदस्यत्वांचे ओळखपत्र दाखवणाऱ्यांना प्रत्येकी १ लिटर प्रेट्रोल मोफत देण्यात येणार होते. मात्र ज्या पेट्रोलपंपावर शिवसेनेने आंदोलन आयोजित केले तो पेट्रोलपंप भाजप खासदार नारायण राणे यांचा आहे. शिवसेना आमच्या पेट्रोलपपावरून मोफत पेट्रोल वाटपाचे आंदोलन पुकारून आम्हाला खिचवण्याचा प्रयत्न करते असे म्हणत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरू झाली. त्यानंतर दोन्हीकडीन काही कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली. परिस्थितीचे गांभिर्य वेळीच ओळखत पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करीत यावर नियंत्रण मिळवले. या संघर्षानंतर जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपमधील वाद पुन्हा जिल्ह्यात उफळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या संघर्षानंतर दंगल नियंत्रण पथकही सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहे.
जेव्हा केव्हा कांदे महाग होतात, साखर महाग होते, गोडेतेल महाग होते त्या त्या वेळेत सिंधुदुर्गात शिवसेनेने या सर्व वस्तू नागरिकांना मोफत देत आंदोलने केली आहेत. त्याच पद्धतीने शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही आज पेट्रोलच्या दरवाढीविरोधात आंदोलन घेतले आहे. आज पेट्रोल १६० रुपये प्रति लिटर झाला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि रिक्षाचालक मेटाकुटीला आला आहे. हेच लक्षात घेत आम्ही प्रातिनिधीत स्वरुपात नागरिकांना १ लिटर मोफत पेट्रोल देत आहोत, असे शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times