पुणे: चीनमधील वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या करोना व्हायरसनं आतापर्यंत हजारो बळी गेले आहेत. या व्हायरसच्या विळख्यात जगातील अनेक देश सापडले आहेत. हा व्हायरस रोखण्यात अपयश आलं असताना, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं करोना व्हायरसला रोखण्यासाठी लस विकसित करण्यात यश मिळवलं आहे. अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनी कोडाजेनिक्सच्या मदतीनं ही लस विकसित करण्यात आली आहे. ही लस प्राथमिक स्तरावर वैद्यकीय चाचणीसाठी उपलब्ध असून, सहा महिन्यांनतर एखाद्या व्यक्तीवर या लसीची चाचणी केली जाईल.

करोना रोखण्यासाठी एसआयआय आणि कोडाजेनिक्सद्वारे विकसित करण्यात आलेली लस या व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी एक सुरक्षाकवच असल्याचा दावा केला जात आहे. ‘ही विकसित होणारी लस प्रचंड रोगप्रतिकारशक्ती निर्माण करते. ही लस सहा महिन्यांत मानवी चाचणीसाठी तयार होईल. ही भारताची पहिली लस असेल, जी इतक्या वेगानं या स्तरापर्यंत आणण्यात यश प्राप्त झालं आहे, असं एसआयआयचे सीईओ अदर पूनावाला यांनी सांगितलं.

२०२२ पर्यंत तयार होणार

मानवी चाचणीनंतर या लसीला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मंजुरी मिळवावी लागेल. त्यानंतर करोना व्हायरसला रोखण्यासाठी तिचा वापर करण्यात येईल. मानवी शरीरावर लसीच्या संशोधनासाठी एक वर्ष लागेल. २०२२ च्या सुरुवातीला या लसीची निर्मिती होईल अशी अपेक्षा आहे. ही लस विकसित झाल्यानं जागतिक स्तरावर फैलावलेल्या साथीच्या रोगाचा सामना करण्यात भारत किती सक्षम आहे हेच यातून दिसतं, असं पूनावाला यांनी सांगितलं.

चीनमध्ये १८०० हून अधिक बळी

चीनमधील हुबेई प्रांतात करोनाचे सर्वाधिक बळी गेले आहेत. हुबेई प्रांतातील वुहान शहरातून या व्हायरसची लागण सुरू झाली. करोनामुळे १८६८ जणांचा बळी गेला असून ७२ हजार ४३६ जणांना लागण झाली असल्याचे समोर आले आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाने याबाबत माहिती जारी केली आहे. करोनाचे १०९७ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, ११ हजार ७४१ रुग्णांची प्रकृती नाजूक आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here