‘करोना काळातही सुरू असलेलं राजकारण म्हणजे राजकारणाचं विकृतीकरण आहे. अनुभव नसतानाही मी आव्हान स्कीकारलं. या कामाबद्दल माझं कौतुक होत आहे, पण तुमच्या सहकार्याशिवाय ते काम करणं शक्य नव्हतं. करोना काळात प्रशासनाने मोठी मेहनत केली आणि जनतेनंही मोठं सहकार्य केलं,’ असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
हिंदुत्वावरून भाजपला फटकारलं!
शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केल्यापासून भाजपकडून सातत्याने हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनाला लक्ष्य करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंनी भाजपला सडेतोड उत्तर दिलं आहे. ‘हिंदू हा शब्द उच्चारताना अनेकांना कापरं भरत होती तेव्हा बाळासाहेबांनी गर्व से कहो हम हिंदू हैं…असा नारा दिला. माझं हिंदुत्व हे शेंडी-जानव्याचं नाही हे मी बोललो…पण हे बाळासाहेबांचं वाक्य आहे. हिंदुत्व म्हणजे कुणाचं पेटंन्ट नाही, हिंदुत्व आमच्या ह्रदयात आहे,’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर अप्रत्यक्षपणे पलटवार केला.
बंगालच्या निवडणूक निकालावर भाष्य
उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीवर भाष्य करत बंगाली जनतेचं अभिनंदन केलं आहे. ‘बंगाली जनतेचं कौतुक आहे. कारण त्यांनी ताकद दाखवून दिली. निवडणूक काळात अनेक आरोप झाले, पण बंगाली माणसाने आपलं मत ठामपणे मांडलं. बंगाली माणसाने प्रादेशिक अस्मितेचं उदाहरण दाखवून दिलं,’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या भाषणावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यातील करोना परिस्थितीवर भाष्य केलं. वर्धापनदिनी आपण पक्षाचा म्हणून कोणता राजकीय कार्यक्रम जाहीर केला नाही तर प्रत्येक गाव आणि घर करोनामुक्त करा, असं आवाहन आपण करतोय. असं करणारा दुसरा एकही राजकीय पक्ष नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी इतर सर्व राजकीय पक्षांना टोला लगावला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times