मेळघाटातील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्या जाचाला कंटाळून हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळ्या झाडून आपली जीवनयात्रा संपवली होती.
याप्रकरणी कारागृहात असलेला निलंबीत उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याने जामीन मिळवण्यासाठी अचलपूर न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर शनिवारी पहिले तदर्थ व सत्र न्यायाधीश एस के मुंगीनवार यांनी शिवकुमारचा जामीन अर्ज फेटाळला.
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी गुरुवार १७ जून रोजी दीपालीचे पती राजेश मोहिते यांच्या वतीने न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. तर न्यायालयाने जामिनावरील युक्तिवाद लक्षात घेत शनिवार दि. 19 जून ही तारीख निश्चित केली होती. यावर पहिले तदर्थ व सत्र न्यायाधीश एस के मुंगीनवार यांच्या न्यायालयाने दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर विनोद शिवकुमार याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
विशेष म्हणजे २३ एप्रिल रोजी न्यायालयाने अटकपूर्व जामिनावर निर्णय देत हा अर्ज फेटाळला होता. आता पुन्हा न्यायालयीन जामीन अर्ज फेटाळल्याने अडीच महिन्यांपासून कारागृहात असणारा आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्या अडचणीत वाढ झाली आहे. सरकारच्या वतीने अभियोक्ता धनंजय नवले यांनी या प्रकरणात युक्तिवाद केला.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times