नागपूर : राज्यातील १० जिल्ह्यांना प्रत्यक्ष आणि १४ जिल्ह्यांना अप्रत्यक्ष जोडणारा नागपूर- मुंबई (Nagpur Mumbai Samruddhi Mahamarg) हा युती सरकारच्या काळातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला होत असलेला विरोध झुगारुन काम सुरू ठेवलं. त्यानंतर विद्यमान महाविकास आघाडी सरकारने त्याचे बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग नावाने बारसं केलं आहे.

या महामार्गासाठी मुख्यमंत्री यांनी सुरुवातीला १ मे अर्थात महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त निश्चित केला होता. मात्र तो हुकला आहे. आता त्यासाठी नवा मुहूर्त जवळजवळ निश्चित झाला असून १५ ऑगस्ट ही नवी डेडलाईन ठरवण्यात आली आहे. तसंच आता हे काम वेळेत पूर्ण व्हावं, यासाठी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आग्रही असल्याची माहिती आहे.

नागपूर इंटरचेंज हाच या समृद्धी महामार्गाचा ‘झिरो पाईंट’ आहे. नागपूर ते मुंबई जेएनपीटीपर्यंत ७०१ किमी लांबीच्या या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम ७२ टक्के पूर्ण झाले आहे. केवळ २८ टक्के काम शिल्लक आहे. महामार्गावरील उड्डाणपूल, इंटरचेंजचे काम अपूर्ण असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर झिरो पाईंट असलेल्या नागपूर नजीकच्या शिवमडका येथे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झालं आहे.

झिरो पाईंटवरील कामाची गती पाहता ते लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे.

५२० किमीचा पहिला टप्पा
समृद्धी महामार्गाचे काम ३० नोव्हेंबर २०१५ पासून महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे आले. तेव्हापासून या मार्गाचं काम वेगात सुरू आहे. विक्रमी वेळेत जमीन अधीग्रहण यासह विविध कामे करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील नागपूर-शिर्डी दरम्यानचा ५२० किमीचा पहिला टप्पा १५ ऑगस्टपासून वाहतुकीसाठी खुला व्हावा यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे हे काम वेळेत पूर्ण होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here