म. टा. विशेष प्रतिनिधी,

करोनाची रुग्णसंख्या हळूहळू कमी होत असताना, करोनाच्या चाचण्यांची खासगी प्रयोगशाळांमधील संख्याही घटली आहे. त्याऐवजी आता पावसाळी आजारांसाठी करण्यात येणाऱ्या चाचण्यांची संख्या वाढत आहे. करोनाव्यतिरिक्त अन्य आजारांच्या चाचण्यांची संख्या दोन महिन्यांपूर्वी कमी होती. आता मात्र त्यात ३० ते ४० टक्के वाढ झाल्याचे वैद्यकीय निरीक्षण प्रयोगशाळाचालकांनी मांडले आहे. व्हायरल ताप, मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांसाठी रक्ताचे नमुने तपासणीसाठी अधिक येत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

संसर्गाची दुसरी लाट हळूहळू कमी होत होती, त्यावेळी करोनाच्या चाचण्यांची संख्याही कमी झाली. करोनाचा संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत या चाचण्या मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. मात्र, आता यात बदल होताना दिसत आहे. पॅथालॉजिस्ट असोसिएशनचे डॉ. प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले की, पावसाळा सुरू झाल्यानंतर दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे आजार डोके वर काढतात. मात्र, गेल्यावर्षी करोनाचा जोर वाढता होता. त्यामुळे पावसाळी आजारांच्या चाचण्यांची संख्या कमी झाली होती. कोणत्याही प्रकारचा ताप हा करोनाचा ताप म्हणून पाहिला जात होता. आता करोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे इतर आजारांचे निदान व्हावे यासाठी चाचण्यांची संख्या हळूहळू वाढते आहे.

करोनाच्या चाचण्यांपैकी सार्वजनिक प्रयोगशाळांमध्ये केलेल्या ८५.८६ टक्के चाचण्या या निगेटिव्ह आल्या आहेत; तर खासगी प्रयोगशाळांमध्ये केलेल्या चाचण्यांपैकी ७८.६७ टक्के चाचण्या निगेटिव्ह होत्या. तसेच पॉझिटिव्ह रिपोर्ट येण्याचे प्रमाण सार्वजनिक प्रयोगशाळांमध्ये १४.१४ टक्के, तर खासगी प्रयोगशाळांमध्ये २१.३३ टक्के नोंदवण्यात आले आहे. या दोन्ही प्रकारच्या प्रयोगशाळांमध्ये झालेल्या चाचण्यांमधून पॉझिटिव्ह चाचण्यांचे प्रमाण १६.७८ टक्के, तर निगेटिव्ह चाचण्यांचे प्रमाण ८३.२२ टक्के असल्याचे सरकारच्या अहवालावरून स्पष्ट होते.

शस्त्रक्रिया पुन्हा सुरू

करोना संसर्गामुळे अनेक रुग्णालये बंद होती, तर काही रुग्णालयांचे रूपांतर हे नॉन कोविड रुग्णालयांमध्ये करण्यात आले होते. हळूहळू हे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रलंबित शस्त्रक्रियाही पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. या शस्त्रक्रिया करण्यापूर्वी काही वैद्यकीय चाचण्या कराव्या लागतात, त्या करून घेण्यासाठी रुग्ण येतात. खासगी रुग्णालयांमधून या रुग्णांसोबत कुटुंबातील जो सदस्य काळजी घेण्यासाठी रुग्णालयामध्ये थांबेल त्यांचीही चाचणी करून घेण्याचा आग्रह असतो. प्रवासाच्या निमित्ताने वा शस्त्रक्रियांच्या कारणांसाठी होणाऱ्या आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या अधिक असल्याचे डॉ. श्रीराम भोईर यांनी सांगितले.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here