बुलडाणा : जिल्हा कृषी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सरकारी तलावांमध्ये कृषी विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शेकडो मासे मृत्युमुखी पडले आहेत. या प्रकाराने स्थानिक परिसरातील नागरिकांकडून रोष व्यक्त केला जातोय तर मृत माशांमुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

बुलडाणा शहरातील टीबी हॉस्पिटलच्या बाजूला आणि जिल्हा कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाला लागूनच असलेला सरकारी तलाव मत्स्य विभागाने कृषी विभागाला हस्तांतरित केलेला आहे. या ऐतिहासिक तलावाला जलपर्णीने पूर्णपणे व्यापून टाकले असून या तलावात असलेल्या शेकडो टन माशांचा ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झालेला आहे. मात्र, याकडे स्थानिक प्रशासनासह कृषी विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले असून आरोग्य कृषी विभाग स्थानिक नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

हा तलाव एकता मत्स व्यवसाय संस्थेला देण्यात आला आहे. काही कार्यालयीन प्रक्रियेमुळे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या तलावाची सर्वस्व जबाबदारी ही कृषी विभागाची असून कृषी विभागाचा गलथान आणि हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

स्थानिक नागरिक आपले आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी या परिसरात फिरण्यासाठी येत असतात. तर हा तलाव ऐतिहासिक असल्याने पर्यटकदेखील याला भेटी देत असतात. त्यामुळेच शहराचे ऐतिहासिक सौंदर्य असलेले हे तलाव जपण्यासाठी स्थानिक आमदारांनी काही महिन्यापूर्वी या तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून भूमिपूजन देखील केले होते.

तरीदेखील संबंधित विभागाने याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. या दुर्गंधीमुळे आता नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने चोवीस तासाच्या आत या तलावाची स्वच्छता करावी अन्यथा या तलावात उतरून आंदोलन करण्याचा इशारा आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here