एल्गार परिषद प्रकरणाच्या तपासात पोलिसांची भूमिका योग्य नव्हती. त्यामुळं हे प्रकरण एसआयटीकडं देण्यात यावं, अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारला पत्र लिहून केली होती. त्यावर काही निर्णय होण्याआधीच केंद्र सरकारनं यात हस्तक्षेप करून हे प्रकरण एनआयएकडे वर्ग करण्याचे निर्देश दिले होते. हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यास राज्य सरकारने सत्र न्यायालयात विरोध दर्शवला होता. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आमची यंत्रणा सक्षम असल्याचं राज्य सरकारनं सत्र न्यायालयात स्पष्ट केलं होतं. केंद्राच्या एनआयएकडे हा तपास देता कामा नये, अशी राष्ट्रवादीची भूमिका होती. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या अधिकारात हा तपास एनआयएकडं देण्यास मान्यता दिली. त्यामुळं शरद पवार नाराज झाले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनं या प्रकरणाची समांतर चौकशी करण्याची भूमिका घेतली आहे. त्यासाठी गृहखात्याच्या अखत्यारीत स्वतंत्र एसआयटीची स्थापना करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसनं हे प्रकरण लावून धरल्यानंतर आता काँग्रेसकडून थोरात यांनी पक्षाची भूमिका मांडली आहे. ‘एल्गार परिषदेचं व्यासपीठ पुरोगामी लोकांचं होतं. तिथं कुणी वेगळं वागलं असेल. त्याबद्दलचा काही पुरावा असेल तर आम्ही त्यांची बाजू घेणार नाही. मात्र, जे कवी, विचारवंत होते. त्यांनी काही पुरोगामी विचार मांडला. त्यांची चौकशी करणं चुकीचं आहे,’ असं थोरात म्हणाले. ‘महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्यासारख्या विचारवंतांच्या हत्या झाल्या. एल्गारच्या निमित्तानं महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळ संपवण्याचा डाव आहे का? संपूर्ण आंबेडकरी, दलित चळवळीलाच नक्षलवादी ठरवण्याचा डाव आहे का?, अशी चिंता वाटते. या प्रकरणाचा तपास एनआयएकडं देण्याची काळवेळ पाहिली तर संपूर्ण समाज, राज्य आणि देश या प्रकरणाकंड संशयानं पाहतोय’, असंही त्यांनी सांगितलं.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times