‘शिवसेना पक्षप्रमुख हे शिवसेनेचे गँग प्रमुखच आहेत, गँग प्रमुखाच्या बापाने काय केलंय, हे अवघ्या जगाला माहिती आहे. त्यामुळे गँग प्रमुखाच्या नादाला लागू नका. कारण गँग प्रमुखाने नुसता आदेश दिला, तरी बाकी काय होते ते मुंबईच्या सेना भवनासमोर सर्वांनी पाहिलं आहे,’ अशा शब्दांत शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना इशारा दिला आहे.
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाषण केलं होतं. त्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली. हे सत्ता प्रमुखाचे नव्हे तर गँग प्रमुखाचे भाषण आहे, अशी टीका त्यांनी केली होती. शिवसेनेकडून मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुनगंटीवारांवर पलटवार करत गँग प्रमुखाच्या नादी न लागण्याचा इशारा दिला आहे.
जळगावात पत्रकारांशी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील हे म्हणाले की, सुधीरभाऊंसारख्या नेत्याने अशा प्रकारचे वक्तव्य करणे हास्यास्पद आहे. शिवसेना प्रमुखांचे पुत्र गँगप्रमुख आहेतच. ते आम्ही मान्य करतो. ते शिवसेनेचे गँगप्रमुख आहेत. तुमच्या गँगप्रमुखांची काय कामे चालू आहेत? हे आम्हाला चांगले माहिती आहे. त्यामुळे कृपा करून शिवसेनेच्या नादी लागू नये, अशा आक्रमक शब्दांत गुलाबराव पाटील यांनी सुधीर मुनगंटीवार यांचा समाचार घेतला आहे.
दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी जोरदार पलटवार केल्यानंतर आता पुन्हा एकदा सुधीर मुनगंटीवार हे त्यांना उत्तर देणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times