‘शिवसेनेनी भाजपसोबत यावं अशी अनेकांची इच्छा असू शकते. मात्र यावर आमचं स्पष्ट मत आहे की हा त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे. हे पत्र सरनाईक यांनी त्यांच्या प्रमुखांना लिहिलं आहे. त्यावर काय उत्तर द्यायचं ते बघतील. आम्ही आता सक्षम विरोधी पक्ष म्हणून राज्यातील जनतेचे प्रश्न मांडत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की मागील निवडणुकीत आम्ही युतीत निवडणूक लढल्याने बहुमतापर्यंत पोहोचलो नव्हतो, मात्र आगामी काळात आम्ही बहुमतासह सत्तेत येऊ,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेसोबत जाण्यास भाजप इच्छुक
शिवसेनेकडून जुळवून घेण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर भाजप वेट अँड वॉच या भूमिकेत असेल असं बोललं जात होतं. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी स्वबळावरच भाजप बहुमताने सत्तेत येईल, असं म्हटल्याने शिवसेनेसोबत युती करण्यास भाजप अनुकूल नाही की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शिवसेना आमदाराचा लेटरबॉम्ब; नक्की काय म्हणाले प्रताप सरनाईक?
प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या दोन पानांच्या पत्रात भाजप व मोदींशी पुन्हा जुळवून घेण्याची केली विनंती केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा नाहक त्रास होत असून भाजपशी जुळवून घेतल्याने हा त्रास तरी थांबेल, असं सरनाईक यांनी म्हटलं आहे. तसंच, सत्तेत असलेले राष्ट्रवादी-काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत. आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times