विजयसिंह होलम । राज्यातील महाविकास आघाडीच्या () राजकारणात आता दोन नव्या फॉर्म्युल्यांची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी व शिवसेना यांनी एकत्र येणे तर दुसरा शिवसेनेने पुन्हा भाजपशी जवळीक साधणे. राज्यात यावर काय निर्णय व्हायचा तो यशावकाश होईलच. मात्र, अहमदनगरच्या महापौर पदाच्या निवडणुकासाठी () येत्या दहा दिवसांत यापैकी एक निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे कोणत्याही एका नव्या समीकरणाची सुरुवात अहमदनगरपासून होणार हे निश्चित मानले जात आहे.

काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे राज्यातील राजकारणाने वेगळे वळण घेतले आहे. तसे झाले तर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या पत्र लिहून पुन्हा भाजपशी जुळवून घेण्यास सुचविले आहे. राज्यात सध्या दोन्हींचीही जोरदार चर्चा आहे. राज्य स्तरावरील हा निर्णय होईल तेव्हा होईल. अहमदनगरमध्ये मात्र महापौर पदाच्या निवडणुकासाठी येत्या काही दिवसांत हा निर्णय घ्यावा लागणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारच नसल्याने भाजप या निवडणुकीतून बाहेर पडल्याने शिवसेना व राष्ट्रवादीला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. तर दुसरीकडे शिवसेना व भाजप पुन्हा एकत्र येण्याचा पर्यायही खुला झाला आहे.

वाचा:

अहमदनगरमध्ये सध्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने भाजपचा महापौर आहे. सर्वाधिक जागा असूनही शिवसेना सत्तेपासून दूर आहे. विद्यमान महापौर बाबासाहेब वाकळे यांची मुदत ३० जून रोजी संपत आहे. त्यापूर्वी ही निवडणूक घ्यावी लागणार आहे. यासाठी पूर्वीच आरक्षण काढले असून अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी पुढील महापौरपद राखीव झाले आहे. या प्रवर्गातील उमेदवार भाजपकडे नाही. त्यामुळे भाजप या स्पर्धेतून बाहेर पडला. कमी जागा असून काँग्रेसने सर्वांत आधी उमेदवार जाहीर करून या पदावर दावा ठोकला. मुख्य म्हणजे सध्या शहरात काँग्रेस आणि राष्ट्रवादीत वितुष्ट आहे. तर काँग्रेस शिवसेनेशी जवळीक करू पहाते आहे. मात्र, काँग्रेसचे संख्या बळ लक्षात घेता एकट्या शिवसेनेसोबत जाऊन त्यांना हे पद मिळणे अशक्य आहे. काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे व राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यातील राजकीय वैर वाढतच आहे. राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार नाही. शिवाय या निवडणुकीबद्दल त्यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्याचे सर्व अधिकार आमदार जगताप यांच्याकडे आहेत. त्यांनी अद्याप उमेदवार जाहीर केला नाही आणि कोणासोबत युती करणार हेही जाहीर केले नाही. वरिष्ठांच्या निर्णयावर अवलंबून असल्याचे ते सांगतात.

वाचा:

शिवसेनेकडे प्रमुख दोन उमेदवार होते. सुरुवातीला त्यांच्यातच रस्सीखेच सुरू होती. मात्र, मुंबईला जाऊन आल्यानंतर त्यातील एकीने माघार घेतली. त्यामुळे शिवसेनेकडूनही आता एकाच उमेदवारावर एकमत झाले आहे. त्यांनाही राष्ट्रवादीकडून सहकार्य अपेक्षित आहे. शिवाय शिवसेनेचा उमेदवार जगताप यांच्या दृष्टीने सोयीचा मानला जातो. भाजप या निवडणुकीत तटस्थ राहणार असल्याचे यापूर्वीच खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे यांनी जाहीर केले आहे.

वाचा:

महापालिकेत शिवसेना २३, राष्ट्रवादी १९, भाजप १५, काँग्रेस ५, बसपा ४, सपा १ असे पक्षीय बलाबल आहे. एक जागा रिक्त आहे. गेल्या वेळी राष्ट्रवादीने खेळी करून भाजपचा महापौर निवडून आणला होता. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार नव्हते. मात्र, सरकार आल्यानंतर शिवसेनेकडून सातत्याने यासंबंधी तक्रारी केल्या, भाजपचा पाठिंबा काढून शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र यावे, अशी मागणी केली. मात्र, त्याचा काहीही परिणाम झाला नाही.

आता पुन्हा ही निवडणूक होत असताना राज्यात नव्या समीकरणाची चर्चा सुरू आहे. शिवाय येथील महापालिकेतील परिस्थिती लक्षात घेता शिवसेना व राष्ट्रवादी यांना एकत्र यावे लागेल अशी परिस्थिती आहे. तर सरनाईक यांच्या पत्रामुळे आणि त्यावर ठाकरे यांची भूमिका काय असेल याकडे लक्ष लागल्याने दुसऱ्या फॉर्म्युल्याकडेही लक्ष लागले आहे. असे असले तरी नगरी राजकारण कधी कसे फिरेल याचा अंदाज बांधता येत नाही. मात्र, राज्यात होऊ घालतेल्या नव्या समीकरणाला नगरमधून जन्म देण्याची संधी मात्र येथील आणि राज्यपातळीवरील राजकारण्यांना प्राप्त झाली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here