पारनेर: पत्नीला सासरी नांदायला पाठवत नसल्याच्या रागातून जावयाने गोळ्या झाडून केल्याची धक्कादायक घटना पारनेर तालुक्यातील वडझिरे गावात सोमवारी रात्री घडली. मृत महिलेचे नाव सविता सुनील गायकवाड (वय ३५) असे आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून आरोपी राहुल गोरख साबळे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

या घटनेतील आरोपी राहुल गोरख साबळे (रांधे, तालुका- पारनेर) याचा सविता गायकवाड यांची मुलगी अस्मिता हिच्याशी दोन वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह झाला होता. सहा महिने संसार केल्यानंतर घरच्यांचा विरोध असल्याने दोघे वेगवेगळे राहत होते. मध्यंतरीच्या काळात राहुल हा अस्मिताला नांदण्यासाठी पाठवा, म्हणून सांगत होता. दोन दिवसांपूर्वी राहुलने अस्मिताकडे मोबाइल फोन पाठवून पुन्हा सासरी नांदायला ये असा निरोप दिला होता. दरम्यान, सविता गायकवाड यांनी पोलिसांकडे राहुलच्या विरोधात तक्रार दिली होती. याबाबत समजल्यानंतर तो संतापला होता.

सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास राहुलने घरी जाऊन सविता गायकवाड यांना जाब विचारला. तिथे शाब्दिक वाद वाढल्यानंतर राहुलने रागाच्या भरात स्वतः कडील पिस्तूल काढून सविता गायकवाड यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. एक गोळी मानेवर, दुसरी गोळी हाताच्या पंजाला तर तिसरी गोळी कानाजवळ घुसली. जखमी अवस्थेतील सविता गायकवाड यांच्यासोबत असलेल्यांनी आरडा ओरड केल्यानंतर राहुलने घटनास्थळावरून काढता पाय घेतला. तोपर्यंत शेजारी राहणाऱ्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी जखमी अवस्थेतील सविता गायकवाड यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

मयत सविता गायकवाड यांचे मेहुणे संतोष कचर उबाळे यांच्या फिर्यादिवरून राहुल गोरख साबळे यांच्या विरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील, पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. अद्याप आरोपीला अटक करण्यात आली नसल्याची माहिती पारनेर पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here