म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रामुळे राज्यात आणि यांच्यात युती होणार का, याची चर्चा रंगली असताना दुसरीकडे शिवसेनेने सर्जिकल स्ट्राइक करत सोमवारी भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले. हिंगणघाटमधील भाजपचे विद्यमान १० नगरसेवक आणि दोन माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. नगरपालिकेवर सध्या भाजपचीच सत्ता आहे, असे असतानाही १० नगरसेवकांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केल्याने भाजपचा चांगलाच दणका बसल्याचे मानले जात आहे.

एकीकडे भाजपचे नेते युती होणार असे उघडपणे संकेत देत असताना दुसरीकडे शिवसेनेने मात्र पक्ष बळकट करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरूच ठेवली असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. भाजपच्या बालेकिल्ल्यातील नगरसेवक फोडून शिवसेनेने भाजपला उघड आव्हानच दिले आहे. गेली काही वर्षे सातत्याने विदर्भ भाजपचा बालेकिल्ला म्हणून पुढे आला आहे. सोमवारी याच विदर्भातील हिंगणघाट नगरपालिकेतील उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे यांच्यासह भाजपचे विद्यमान १० नगरसेवक आणि दोन माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

काही दिवसांपूर्वी जळगावमध्येसुद्धा शिवसेनेने भाजपला मोठा दणका दिला होता. जळगाव महापालिका महापौर निवडणुकीत भाजपचे २७ नगरसेवक सेनेत खेचून आणले होते. त्यामुळे जळगाव महापालिकेत सेनेचा भगवा फडकला होता. विशेष म्हणजे, जळगाव महापालिकेची जबाबदारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत्य विश्वासू सहकारी असलेले गिरीष महाजन यांच्यावर होती. पण महापौर आणि उपमहापौर निवडणुकीपूर्वीच सत्ताधारी भाजपचे बहुमत संख्याबळ शिवसेनेने राजकीय सर्जिकल स्ट्राइक करत उद्धवस्त केले होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here