आर्णी शहरातील डोंगा कॉलनी येथे भंगार व्यवसायाच्या आड शेख मेहबूब शेख सादिक याने अर्ध्या महाराष्ट्रात गुटख्याचे साम्राज्य निर्माण केले आहे. प्रशासनातील काहींचा वरदहस्त असल्यामुळे शहराच्या केंद्रस्थानी असलेल्या डोंगा कॉलनीत खुलेआम गुटख्याची विक्री केल्या जाते. नुकत्याच 3 दिवासआधी डोंगा कॉलनी येथील भंगारच्या दुकानावर स्थानिक पोलिसांनी कारवाई करून ९३ हजाराचा गुटखा पकडण्यात आला होता. परंतु त्यानंतरही आज सकाळी वाहन क्रमांक एमएच २९ सी ५६८४ टाटा आयशरमध्ये प्रतिबंधित गुटखा आर्णीकडे जात असल्याची गुप्त माहिती एलसीबीला मिळाली.
या माहितीच्या आधारे सापळा रचून सदर संशयित ट्रक एलसीबीने ताब्यात घेतला व प्राप्त माहितीनुसार मेहबूब याच्या कुऱ्हानजीक असलेल्या शेतात, बुटले पेट्रोल पंप नजीक व डोंगा कॉलनी स्थित गोदमावर धाड टाकण्यात आली. एलसीबीने धडक कारवाई करून तब्बल २९ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व गुटखा वाहून नेणारे ८ लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण ३७ लाख ८१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच गुटखा तस्कर शेख मेहबूब शेख सादिक(३८), आरिफ रौफ बैलीम (२९) वाहन चालक, शेख सलीम शेख गफ्फार, आतिष शालिकाराव कोडापे(३८)यांना जेरबंद करून अन्न सुरक्षा मानक कायद्यान्वये अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी औषधी व अन्न सुरक्षा विभागाचे एफएसओ गोपाल माहुरे व घनश्याम दंदे उपस्थित होते. तसेच सदरील कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ व अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात सपोनि विवेक देशमुख, योगेश रंधे,पोहवा गजानन डोंगरे, विशाल भगत, उमेश पिसाळकर, बबलू चव्हाण, उल्हास कुरकुटे यांनी कारवाई केली. आर्णी तालुक्याच्या इतिहासातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.
भुजबळांकडून आश्वासनाची पूर्तता…
दहा महिन्याआधी आर्णी पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी शहरातील गुटखा तस्करांचे कंबरडे मोडण्याचे आश्वासन आर्णीकरांना दिले होते. उशिरा का होईना पण आज त्या आश्वासनांची पूर्तता केल्यामुळे नागरिकांनी भुजबळांचे आभार मानले. तसेच कारवाईत सातत्य ठेवून गुटखा तस्करीचा आर्णी शहराला लागलेला डाग समूळ नष्ट करावा अशी मागणी जनतेतून होताना दिसत आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times