मुंबईः महाराष्ट्रात करोना विषाणूनं थैमान घातलं असतानाच राज्याच्या चिंतेत भर घालणारी बातमी समोर येत आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमधील गुहेतील दोन वटवाघुळांमध्ये निपाह विषाणू सापडला आहे. राज्यात निपाह विषाणू आढळण्याची ही पहिलीच घटना आहे. हा विषाणू सर्वप्रथम कुठं आढळला? त्याची लागण कशी होते आणि त्यापासून काळजी कशी घ्यावी, याबद्दल घेतलेला विस्तृत आढावा.

  1. विषाणू सर्वप्रथम कुठे आढळला?निपाह (एनआयव्ही) हा विषाणूमुळे मनुष्य आणि प्राणी या दोघांमध्येही गंभीर स्वरुपाचे आजार निर्माण होऊ शकतात. सर्वप्रथम एनआयव्ही १९९८ मध्ये मलेशियातील वराहपालकांमध्ये आढळला होता. त्यानंतर संपूर्ण जगभरात निपाहचा प्रसार झाला. वाटवाघळे ही या विषाणूची नैसर्गिक वाहक आहेत.
  2. निपाहचा प्रसार कसा होतो?वटवाघूळ नैसर्गिक वाहक असल्यानं वटवाघळांनी खाल्लेली किंवा चाटलेली फळं खाल्ल्यानं निपाहचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. तसंच, निपाहचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्यास संसर्ग होऊ शकतो. एनआयव्हीचा संसर्ग झालेली वटवाघळे आणि डुकरांच्या थेट संपर्कातूनही हा संसर्ग होऊ शकतो, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. मानवाला विषाणूंचा संसर्ग प्रामुख्याने डोळे, नाक, तोंडाद्वारे होण्याची शक्यता असते.
  3. निपाहची लक्षणे काय?‘ताप, अंगदुखी, श्वास घेण्यास त्रास होणे, डोकेदुखी, छातीत जळजळणे, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे, प्रकाशाची भीती वाटणे, अशी या आजाराची लक्षणे आहेत. यासारख्या लक्षणांवर उपचार करणारे डॉक्टर आणि नर्सना विषाणूची माहिती नसल्यास त्यांचाही जीव धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते.
  4. निपाहवर उपचार कोणते?या विषाणूमुळं होणाऱ्या संसर्गावर कोणतेही ठोस उपचार नाहीत. या आजारावर अद्याप औषधे व लस उपलब्ध नसल्यानं संसर्गामुळं होणारा मृत्यूदरही अधिक आहे. ‘निपाह’ विषाणूचा ‘स्वाइन फ्लू’सारखा वेगाने संसर्ग होत नाही किंवा त्याचा प्रसार होत नाही. मात्र ‘स्वाइन फ्लू’च्या तुलनेत ‘निपाह’ विषाणूच्या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.
  5. प्राथमिक उपचार कोणते?संसर्ग झाल्याचे लक्षात येताच रुग्णाला अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येतात. या विषाणूमुळे होणाऱ्या आजार टाळण्यासाठी कोणतीही लस नाही. संसर्ग झाल्यावर इन्क्युबेशन कालावधी ५ते १४ दिवस असतो.
  6. भारतात कधी आली होती साथ?भारतात यापूर्वी २००१मध्ये जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यात सिलिगुडी (पश्मिम बंगाल) येथे निपाहचे ६६ रूग्ण आढळले होते. त्यापैकी ४५ रूग्णांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला होता. २००७मध्ये एप्रिल महिन्यात पश्निम बंगालमधील नादिया येथे निपाहचे पाच रुग्ण आढळले होते. त्या पाचही रुग्णांचा मृत्यू झाला होता.
  7. हेही लक्षात ठेवाएका वटवाघळाकडून दुसऱ्या वटवाघळाला संसर्ग होत नाही. एका वटवाघळाला विषाणूची लागण झाल्याने दुसऱ्या वटवाघळांमध्ये ‘अॅन्टीबॉडीज’ तयार होतात. त्यामुळे त्यांना संसर्ग होत नसल्याने सर्वच वटवाघळांमध्ये विषाणू असतो, असे समजू नये. मोजक्याच वटवाघळांमध्ये विषाणूचा संसर्ग होतो.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here