नवी मुंबई: कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी रायगड जिल्हा विशेष लेखापरीक्षकांनी बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार यांच्यासह संचालक, अधिकारी अशा ७६ जणांविरोधात एफआयआर दाखल केला असून, त्याआधारे या सर्वांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ५१२.५४ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.

कर्नाळा बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्यासह संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्जदार अशा एकूण ७६ जणांवर ठेवीदार-खातेदारांची फसवणूक, अपहार केल्याप्रकरणी गुन्ह्यांची नोंद केली आहे. गैरव्यवहार करून बँक ठेवीदार आणि सरकारची फसवणूक आणि तब्बल ५१२.५४ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा ठपका आहे. रायगड जिल्ह्यातील विशेष लेखापरीक्षकांनी लेखा परीक्षण केल्यानंतर त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. चार महिन्यांपूर्वी छाननी केल्यानंतर सादर केलेल्या लेखा परीक्षण अहवालात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत. कर्ज वितरण कागदपत्रे नष्ट केल्याचं, बोगस कागदपत्रांच्या आधारे २००८ पासून कर्ज वितरित केल्याचं आणि दस्तावेजांमध्ये फेरफार केल्याचं या अहवालातून उघड झालं आहे.

विशेष म्हणजे, गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये ६२ जण कर्जदारही आहेत. कोणत्याही हमीशिवाय त्यांना कर्ज देण्यात आलं आहे. त्यानंतर कर्जाची रक्कम विवेक पाटील हे चालवत असलेल्या संस्थेकडे वळवण्यात आल्याचाही आरोप आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच, या बँक गैरव्यवहारप्रकरणी भाजप नेते आणि आमदार प्रशांत ठाकूर आणि किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं होतं. या बँकेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here