: शहरातील वाकी परिसरात सहलीला गेलेल्या चार मित्रांना नदी पात्रात पोहण्याचा मोह जीवावर बेतला आहे. कन्हान नदीपात्रातील खोल डोहात बुडाल्याने या ४ जणांचा मंगळवारी मृत्यू झाला. त्यापैकी एकाचा मृतदेह हाती लागला असून अन्य तिघांचा शोध घेतला जात आहे.

तौफीक आशिफ खान (१६ रा. शांती नगर), प्रविण गलोरकर (१७ रा. जयभिम चौक, यादव नगर), अवेश शेख नासीर शेख (१७ रा. वीएचबी कॉलनी) आणि आरिफ अकबर पटेल (१६ रा. यादव नगर, जयभिम चौक) अशी नदीत झालेल्या चार मित्रांची नावे आहेत. या चौघांसह तेजू पोटपसे (२०), थायान काजी (१८), पलाश जोशी (२०), विशाल चव्हाण (२५) हे अन्य चौघेही वाकी येथे सहलीसाठी गेले होते.

या सर्व मित्रांना सहलीच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर द्वारका वॉटर पार्क बंद असल्याचे दिसले. यामुळे त्यांनी परिसरातल्या कन्हान नदीच्या पात्रात फिरायला जाण्याचे ठरवले. आठही जण गाडीने कन्हान नदी पात्राच्या दिशेने गेले. नदीजवळ पोहोचताच चौघांना पोहायचा मोह आवरला नाही. त्यातील आठ पैकी हे चौघे पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र, या युवकांना पाण्याचा अंदाज आला नाही. खोल पाण्यात गेल्याने ते बुडू लागले. सोबतच्या अन्य मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना त्यांचा जीव वाचवता आला नाही.

पावसामुळे शोधकार्यात अडचण
घटनेची माहिती मिळताच खापा पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने चौघांच्याही मृतदेहाचा शोध सुरू केला. मात्र परिसरात पाऊस सुरू असल्याने शोध कार्यात अडथळे निर्माण झाले. बुडालेल्या चौघांपैकी अवेश शेख नासीर शेख याचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला असून इतर तिघांचा शोध सुरू आहे.

फलकाकडे होतेय दुर्लक्ष
वाकी येथील कन्हान नदीच्या पात्रात खोलगट डोह आहे. या डोहात आजवर अनेकांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी पोहण्यासाठी सक्त मनाई आहे. याची माहिती देणारे सूचना फलकही लावण्यात आले आहेत. मात्र, या तरुणांनी फलकाकडे दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here