: मराठा आरक्षणासाठी () रस्त्यावर उतरत आंदोलनाचे राज्यव्यापी नेतृत्व करणाऱ्या खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या नेतृत्वाला महिन्याभरातच सुरूंग लागल्याचं पाहायला मिळत आहे. संभाजीराजेंनी आंदोलन स्थगित केल्यानंतर तासाभरातच आंदोलनाची हाक देत कोल्हापुरातच त्यांना आव्हान देण्यात आलं. यामुळे एकसंघ चाललेल्या आंदोलनाला फुटीचे गालबोट लागले. ‘संयम नको, आक्रमकपणा हवा’ असे सांगत अनेकांनी वेगवेगळी चूल मांडल्याने आंदोलनाची धार कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यात पुन्हा लढाई सुरू झाली आहे. खासदार संभाजीराजेंनी यामध्ये पुढाकार घेत आंदोलनाची सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली. त्यांच्या नेतृत्वाखालीच हा लढा लढण्यास राज्यातील सकल मराठा समाजाचे समन्वयांकसह सर्वच पक्षाच्या नेत्यांनी मान्यता दिली. त्यानुसार त्यांनी आंदोलनाचे टप्पे पाडले. मूक आंदोलनाने त्याची सुरूवातही झाली. त्याची दखल सरकारला घ्यावी लागली. सरकारने मागण्या मान्य केल्या. त्यामुळे संभाजीराजेंनी एक महिन्यासाठी आंदोलन स्थगित केले.

आंदोलनात का झाले मतभेद?
महिनाभर अतिशय व्यवस्थित सुरू असलेल्या या आंदोलनात आता अचानक फूट पडली आहे. यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरल्या. संभाजीराजे आक्रमक होतील आणि राज्यात महाविकास आघाडीच्या विरोधात ठिणगी पेटेल असे भाजपला वाटत होते. पण, तसे झाले नाही. यामुळे या पक्षाचे नेते त्यांच्यावर नाराज झाले. ते महाविकास आघाडीला पूरक भूमिका घेत असल्याची टीका त्यांच्यावर झाली. राजेंचा संयमी स्वभाव अनेकांना पटला नाही. त्यातूनच भाजपच्या काही नेत्यांनी स्वतंत्र आंदोलनाची भाषा सुरू केली.

आमदार नरेंद्र पाटील यांनी सोलापुरात मोर्चा काढण्याचा इशारा दिला. या पक्षाच्या तालावर नाचणारे मराठा क्रांती मोर्चाचे सुरेश पाटील यांनी मुंबईत गोलमेज परिषद घेण्याची जाहीर केले, विनायक मेटे यांनी मोर्चा काढला. या सर्व घटनेतून भाजपने आपली चूल वेगळी मांडण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट दिसते.

एकीकडे संभाजीराजेंना आव्हान देताना दुसरीकडे त्यांच्या नेतृत्वाखालीच लढा लढण्यास मान्यता देत भाजप कार्यकर्ते सहभागी होत राहिले. ‘राजे सांगतील ते धोरण’ अशी भूमिका कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने घेतली. राज्यभरातील सकल मराठा समाजानेही हीच भूमिका घेतली. पण आठ दिवसांत कोल्हापुरातच राजेंना आव्हान दिले गेले. त्यांनी नाशिकमध्ये आंदोलन स्थगितीची घोषणा करताच कोल्हापुरात चक्का जाम आंदोलनाची हाक देण्यात आली.

पोलिसांची विनंती धुडकावून लावत चक्काजाम आंदोलन केले. एकीकडे मराठा आरक्षणासाठी एकत्रित येऊन सरकारला गुडघे टेकायला लावण्याची भाषा करत असताना दुसरीकडे लढ्यात फुट पाडण्यात आली. यामुळे ज्या कोल्हापुरातून आरक्षणाच्या लढाईची ठिणगी पेटली, त्याच कोल्हापुरातच संभाजीराजेंच्या नेतृत्वाला आव्हान देण्यात आले. याबाबत आता राज्यात उलटसुलट चर्चेला वेग आला आहे.

काय आहे आंदोलकांचं म्हणणं?
संभाजीराजेंना सरकार फसवत आहे, त्यांचे आंदोलन आक्रमक नसल्याने सरकार गुडघे टेकत नाही अशा भावना व्यक्त करत त्यांच्या नेतृत्वाला कोल्हापुरातच सुरूंग लावण्यात आले. आक्रमकतेच्या जोरावर टोललढा यशस्वी करत कोल्हापुरकरांनी आपला वेगळा कोल्हापुरी पॅटर्न तयार केला. त्याच रितीने प्रत्येक आंदोलन करत सर्व मागण्या मान्य करून घेण्याचा कोल्हापुरातील सर्वपक्षीय कृती समितीचा प्रयत्न आहे.

‘ हेच आमचे अंतिम ध्येय आहे. आमचे आंदोलन वेगळे असले तरी ते संभाजीराजेंना बळ देणारे आहे. फक्त आमचा मार्ग वेगळा आहे. ही एक नवीन व्युहरचना आहे,’ असं सामाजिक कार्यकर्ते अॅड. बाबा इंदुलकर यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे, संभाजीराजे हे आरक्षणाच्या मूळ मागणीकडे दुर्लक्ष करून पूरक मागण्यावरच भर देत आहेत. त्यामुळे आमचे समाधान होत नसल्याने आम्हाला मराठा आरक्षणाच्या मूळ मागणीसाठी हे आंदोलन करावे लागत आहे, असं प्रा. जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here