मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर असून आज सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांनी कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण आणि एल्गार परिषद तपास तसेच नाणारसह कोकणच्या विकासाच्या विविध मुद्द्यांवर भाष्य केले. मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर काही वेळातच राणे यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. शिवसेनेत अंतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणावर असून भास्कर जाधव यांच्या नाराजीनाट्याने ही धुसफूस चव्हाट्यावर आली आहे, असे नमूद करत यांचं सरकार फार काळ टिकणार नाही, असे राणे म्हणाले.
कोकणातील कळीच्या अनेक मुद्द्यांवर बोट ठेवत राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. मुख्यमंत्री येथे पर्यटक म्हणून आले आणि निघून केले. या दौऱ्यात त्यांनी कोकणसाठी काहीही दिले नाही. फक्त फसव्या घोषणा करून ते माघारी परतले, असा आरोप राणे यांनी केला. कोकणला एक रुपयाचाही निधी न देता मुख्यमंत्री येथून जातात, ही कोकणची थट्टा आहे, असे राणे म्हणाले. चिपी विमानतळ मी उभारला, असा दावाही राणे यांनी केला. विमान उतरण्याचा मुहूर्त मुख्यमंत्री सांगत असले तरी कोणते विमान उतरवणार हे त्यांनी सांगितलेले नाही, असा टोलाही राणे यांनी लगावला.
राणेंकडून नाणारचे समर्थन!
नारायण राणे यांनी यावेळी नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केले. रिफायनरीबाबत भाजपचे जे मत आहे तेच माझेही मत आहे, असे नमूद करत कोकणात मोठी गुंतवणूक व्हायला हवी, अशी अपेक्षा राणे यांनी व्यक्त केली.
Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines