करोनाचा डेल्टा प्लस व्हेरियंट हा जगातील ९ देशांमध्ये आढळला आहे. भारतात आतापर्यंत या डेल्टा प्लस व्हेरियंटचे २२ रुग्ण आढळले आहेत. यातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रातील जळगाव आणि रत्नागिरीत आहेत. याशिवाय केरळच्या पलक्कड आणि पथनमथिट्टा जिल्ह्यात आणि मध्य प्रदेशात भोपाळ आणि शिवपुरी जिल्ह्या डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आले आहेत, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं.
SARS-CoV-2 जिनोमिक कंसोर्टिया निष्कर्षांच्या आधारावर महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांना सतर्कतेची सूचना केली आहे. पण यामुळे अधिक चिंता करण्याची गरज नाही, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.
डेल्टा प्लस व्हेरियंटचा सामना कसा करणार? राज्यांना केंद्राचे पत्र
करोनाचा डेल्टा व्हेरियंट जगातील ८० देशांमध्ये आढळून आला आहे. भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेमागे हाच व्हेरियंट कारणीभूत असल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे याला व्हेरियंट ऑफ कन्सर्नच्या श्रेणीत ठेवण्यात आलं आहे. डेल्टा प्लस व्हेरियंट आता ९ देशांमध्ये आढळला आहे. ब्रिटन, अमेरिका, जपान, रशिया, भारत, पोर्तुगाल, स्वीत्झर्लंड, नेपाळ आणि चीन या देशांमध्ये हा व्हेरियंट आढळला आहे. आता हा व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट श्रेणीत आहे, असं नीती आयोगाचे (आरोग्य) सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितलं. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने डेल्टा प्लस व्हेरियंटसंबंधी राज्यांना पत्र लिहिले आहे. डेल्टा प्लस व्हेरियंटचा सामना कसा करायचा? याबाबत या पत्रात सूचना देण्यात आल्या आहेत.
‘डेल्टा प्लस व्हेरियंटचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न’
करोना व्हायरस कधी आपलं स्वरुप बदलेल याचा अंदाज कुणीच लावू शकत नाही. पण जगातील अनेक देश आहेत जिथे करोनाची दुसरी लाट आलेली नाही आणि ना चौथी लाट येईल. आपण सावध राहिलो आणि काळजी घेतली तर तो संसर्ग नियंत्रणात राहील. दिलासादायकबाब म्हणजे ७ मे च्या तुलनेत देशात करोना रुग्णांची संख्या ९० टक्क्यांनी कमी झाली आहे, अशी माहिती डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times